पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समिती आयोजित ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले

हिंदु धर्मामुळेच भारत ‘डीप स्टेट’ समोर टिकून आहे !- श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

पुणे – बांग्लादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. यामागे अमेरिका, चर्च, जिहादी इस्लाम आणि चीन अशा ‘डीप स्टेट’ शक्तींचा छुपा पाठींबा होता. या शक्तींनी भारतातही नागरिकत्व कायदा आणि शेतकरी आंदोलनांद्वारे अराजक माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदू धर्माच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ तत्त्वामुळेच या डीप स्टेट मधील शक्ती भारताविरोधात उभ्या ठाकूनही केवळ हिंदु धर्मामुळे भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.पुणे येथे रविवार दिनांक १९ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आयोजित जिल्हास्तरीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या कार्यक्रमात मान्यवर वक्ते म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक हभप दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सचिन घुले, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांच्यासह १७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

कार्यक्रमाचा आरंभ शंखनाद आणि प.पू. रामनाथजी येवले महाराज, ओम जय शिवशंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पू. पप्पाजी पुराणिक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक हभप दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाला. त्यानंतर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. धर्माप्रेमींनी परिसंवाद आणि गटचर्चा यांच्या माध्यमातून अनुभवकथन, कार्याची पुढील दिशा आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी नियोजन केले. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरु स्वाती खाडये यांनी काळानुसार साधनेची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वन्दे मातरम् म्हणून झाली.

ब्रिगेडियर हेमंत महाजन

बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यासाठी सरकारने स्थानिक सुरक्षा यंत्रणांना अधिक सक्षम करावे ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन

बांगलादेशात हिंदूंची संख्या १९५० मध्ये २६% होती, आज ८% पेक्षा कमी आहे. उलट भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, ४० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत. बांगलादेशी घुसखोरी याविषयी ‘बोर्डर सिक्युरिटी फोर्स’ आणि स्थानिक पोलीस यंत्रणा गंभीर संवेदनशीलता दाखवत नाहीत.डावे विचारवंत, काही एनजीओ आणि जिहादी संघटनांद्वारे विविध माध्यमांतून देश पोखरला जात आहे. बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणांना अधिक सक्षम करणे अत्यावश्यक आहे.

सौ. उज्ज्वला गौड, संस्थापक अध्यक्षा, रणरागिणी महिला विचार मंच

 हिंदूंनो, सर्वहिंदु समभाव बाळगा आणि आघातांविरोधात कृतीशील व्हा ! – सौ. उज्ज्वला गौड, संस्थापक अध्यक्षा, रणरागिणी महिला विचार मंच

पुण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत मजारी बांधल्या जात आहेत. शनिवारवाडा आणि लाल महाल परिसरातही मजारी उभ्या केल्या जात आहेत. त्यांचे पुढे दर्गे-मशिदी मध्ये रुपांतर होईल. देवभूमी आळंदी येथील चिंबळी ग्रामपंचायतीने विरोध करूनही ४७ गुंठ्यांवर मशीद उभी केली जात आहे. हिंदू बांधवांनो, सर्वधर्मसमभाव नव्हे, सर्व ‘हिंदुसमभाव’ बाळगा आणि हिंदुंवर होणाऱ्या आघातांविरोधात कृतीशील व्हा.