तन्मय यांच्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार अगदी त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच झालेले आहेत. त्यांचे आजोबा उत्तम तबला वादक होते, मामा श्री विनायक नाईक हे प्रतिष्ठित वादक आहेत, तर आई सौ. धनश्री बिच्छू या गायिका व संगीत शिक्षिका आहेत. अशा सांगीतिक वातावरणात वाढल्याने तनयांना लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. मामा त्यांना कार्यक्रमांना घेऊन जात असत, ज्यातून त्यांचा संगीतावरील ओढ अधिकच वाढला. हे पाहून आई-वडिलांनी त्यांचे औपचारिक शिक्षण सुरू केले, आणि तेव्हापासून तबल्याशी त्यांचे घट्ट नाते जुळले.
साथ-संगतीबाबत तन्मय सांगतात की, ती एक उत्स्फूर्त कला आहे, ज्यात मुख्य कलाकाराच्या अपेक्षा, विचार, आणि लय ओळखून त्याला आधार देणे महत्त्वाचे असते. शास्त्रीय गायनात संथ लयीत ठेका ठेवावा लागतो, तर वादनात कलाकाराच्या विचारांशी सुसंगत राहावे लागते. उपशास्त्रीय आणि पाश्चात्य संगीतात ठराविक गोष्टींना साथ देणे आवश्यक असते, तर नृत्यसाथीत नर्तकाच्या हावभावांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. या प्रत्येक प्रकारासाठीचा रियाज वेगळा असतो, आणि त्याची विकसितता अनुभवातून येते.
तन्मय सरांना कोणता राग सर्वात जास्त आवडतो असे विचारल्यावर ते म्हणतात की आवडता राग किंवा ताल निवडणे तनयांना कठीण वाटते, कारण प्रत्येक काळात वेगवेगळे राग आणि ताल त्यांच्या मनात घर करतात. लहानपणापासून विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचा बिहाग, छायानट, विदुषी किशोरी आमोणकर यांचा भूप, पंडित उल्हास कशाळकर यांचा सोहनी, आणि विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचा खेम कल्याण हे राग त्यांना आवडतात. तालांपैकी तीनताल कायमच प्रिय आहे, पण एखाद्या नवीन तालाचा अभ्यास करताना त्याचे सौंदर्य उलगडत जाते आणि तोही खास वाटू लागतो.
भारत आणि अमेरिकेत अनेकदा कार्यक्रम सादर केल्यानंतरही तन्मयना प्रत्येक वेळी मंचावर जाताना उत्साह आणि आनंद अनुभवायला मिळतो. शास्त्रीय संगीत उत्स्फूर्त असते आणि त्यात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घडत असते. नवीन कलाकारांसोबत वाजवताना थोडे दडपण असते, पण हाऊसफुल्ल असो की नाही, प्रेक्षक प्रेमाने ऐकत असतात. त्यांना आनंद देण्याचा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या आशीर्वादांमुळे त्यांना समाधान मिळते.
अनेक पिढ्यांपासून भारतीय शास्त्रीय संगीत ही परंपरा टिकली असून, काळानुसार नवनवीन बदल होत गेले आहेत. आज जागतिकीकरणामुळे आपल्या संगीताचा प्रसार जगभर झाला आहे, आणि पुढील पिढ्यांतील कलाकारही आपली ओळख जागतिक पातळीवर निर्माण करत आहेत. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा कायम राहील, याबाबत तेआशावादी आहेत, म्हणत भारतीय शास्त्रीय संगीतावर आपले विचार मांडतात.