- कृषी क्षेत्रातील प्रयोगशील कंपनीचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प
- ८ राज्यांमधील ६५ जिल्ह्यांमध्ये २५०,००० अधिक प्रगतीशील शेतकऱ्यांवर सकारात्मक प्रभाव
- ४०,००० एकर शेतजमीनीवर आयपीएम पद्धतींची अंमलबजावणी
- ‘वावर’च्या ८० टक्के कर्मचारी महिला, १०० टक्के कृषी पार्श्वभूमी असलेल्या
कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वततेतील अग्रगामी शक्ती असलेल्या ‘वावर’ या कंपनीने अधिक राज्यांपर्यंत आपला विस्तार करण्यावर तसेच १० लाख एकरपेक्षा जास्त शेतजमीनीवर आयपीएम पद्धतींची अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला आहे.
भविष्याचा वेध घेत असताना आपले नाविन्यपूर्ण उपाय वाढविण्यावर ‘वावर’ भर देणार आहे. तसेच, ‘वावर’ मित्रा आणि सहेली, ग्रामीण उद्योजकांचे सक्षमीकरण आणि तळागाळातील शाश्वत कृषी पद्धतींना चालना देणे यासारखे समुदायकेंद्रीत योजना वाढवण्याचीसुद्धा योजना कंपनी आखत आहे.
‘वावर’ने आपला तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा केला. कंपनीने आपल्या स्थापनेपासूनच अत्याधुनिक एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) उपाय आणि शाश्वत शेती पद्धतींद्वारे शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी कटिबद्धता दाखवून दिली आहे. या तीन वर्षांच्या काळात ‘वावर’ने ८ राज्यांमधील ६५ जिल्ह्यांमध्ये आपली मजबूत उपस्थिती नोंदविली आहे. त्यातून २५०,००० हून अधिक प्रगतीशील शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
कंपनीच्या नाविन्यपूर्ण आयपीएम सोल्यूशन्सने हानिकारक रासायनिक कीटकनाशकांवर शेतकऱ्यांचे असलेले अवलंबित्व कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे निरोगी पिके, कमी खर्च आणि प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी वाढीव नफा मिळाला आहे. त्याचाच भाग म्हणून विस्ताराची ही योजना कंपनीने आखली आहे.
‘वावर’चे सहसंस्थापक संजय शिरोडकर म्हणाले, “भारतातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या आमच्या कटिबद्धतेमुळे ‘वावर’च्या प्रवासाला चालना मिळाली आहे. आमचे यश केवळ आमच्या वाढीत नाही तर आम्ही प्रगतीशील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकलो आहोत.
हा महत्त्वाचा क्षण आम्ही साजरा करत असताना, आम्ही शाश्वत उपायांच्या माध्यमातून प्रगतीशील शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या आमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यातून त्यांचे जीवनमान वाढेल आणि हरित भविष्यासाठी योगदान मिळेल.”
‘वावर’चा गेल्या तीन वर्षांचा प्रवास हा वेगवान वाढ आणि विस्ताराचा राहिला आहे. एका दूरदृष्टीच्या स्टार्टअपपासून कंपनी आज कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव बनली आहे. कीटक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीसाठी तिच्या नाविन्यपूर्ण पध्दतींसाठी ती ओळखली जाते. कंपनीच्या विस्तारात ३०० हून अधिक डीलर्सचे मजबूत नेटवर्क आणि ४०,००० एकर शेतजमिनीवर आयपीएम पद्धतींची यशस्वी अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
‘वावर’चे सह-संस्थापक जॉय चक्रवर्ती म्हणाले, “गेली तीन वर्षे म्हणजे आमच्या टीमचे समर्पण आणि कौशल्याचा पुरावा आहे. विशेषत: आमच्या ८० टक्के कर्मचारी महिला आहेत आणि टीममधील प्रत्येक सदस्याला शेतीची सखोल पार्श्वभूमी आहे. या वैविध्य आणि खोलवर रुजलेल्या ज्ञानामुळे आम्हाला खरोखरच शेतकरी समुदायाच्या भावनेचे प्रतिबिंब पाडणे शक्य झाले आहे.”
‘वावर’च्या या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने कर्मचाऱ्यांमधील सौहार्द आणि अभिमानाच्या भावना दिसून आली. त्यातून कंपनीने जोपासलेल्या उत्साही आणि सर्वसमावेशक वातावरणाचे प्रतिबिंब पडले. या सेलिब्रेशनने केवळ भूतकाळातील कामगिरीवर प्रकाश टाकला नाही तर भविष्यातील वाढ आणि प्रयोगशीलतेचाही पाया रचला आहे