श्रद्धावान् लभते ज्ञानम् । विशेष लेख

श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या मागे सनातन संस्थेचे नाव घेणार्‍या मंडळींचा एक आरोप असतो की, सनातन संस्थेने नेहमीच डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला विरोध केला होता. याविषयीची सत्यता काय ?

खरे तर सनातन संस्थेचा डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला विरोध होता कि डॉ. दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंनिसचा सनातन संस्थेच्या कार्याला विरोध होता, याचा प्रथम शोध घ्यायला हवा. 

अंधश्रद्धा निर्मूलन समिति ही चळवळ प्रथम कोल्हापूर येथे चालू झाली. त्या वेळी तिचे नाव होते, ‘मानवीय नास्तिक मंच’ ! यातील नास्तिक शब्दाचा अर्थ काय ? नास्तिक म्हणजे देव-धर्म न मानणारे ! ज्यांना देव-धर्म मानायचा नाही, त्यांचा मंच होता तो. पुढे त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे गोंडस नाव ठेवण्यात आले. 

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे अध्यात्मातील अधिकारी संत बनण्यापूर्वी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक होते. अशा व्यक्तीने अध्यात्माला पूर्णपणे वाहून घ्यावे, हे त्या काळातील मानवीय नास्तिक मंचचे, म्हणजेच आजच्या अंधश्रद्धा निर्मूलवादी चळवळीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि प्रा. शाम मानव या दुकलीला मान्य नव्हते. 

सनातन संस्थेची स्थापना झाली. त्या वेळी संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्माच्या संदर्भातील लेखमालिका विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होऊ लागल्या. सनातन संस्थेचे कार्य सर्वत्र गतीने पसरू लागले. सर्वत्र वैज्ञानिक भाषेत अध्यात्माचा प्रसार होऊ लागल्यानंतर बुद्धीवादी मंडळी अध्यात्माकडे वळू लागली. साधना करू लागली. अकोला-अमरावती जिल्हांमध्ये अंनिसचे सदस्य नास्तिकवादी चळवळ सोडून साधना करू लागले. एकूणच सनातन संस्थेच्या श्रद्धामूलक आध्यात्मिक चळवळीमुळे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचे नास्तिकतेच्या प्रचाराचे धंदे बंद पडू लागले. त्यामुळे त्यांनी सनातन संस्थेला विरोध चालू केला. 

त्या वेळी सनातन संस्थेच्या अध्यात्मावरील लेखातील काही वाक्यांचा विपर्यास करणे, त्यातील आध्यात्मिक शब्दांची बौद्धिक टिंगल उडवणे, सनातनच्या साधकांना आलेल्या आध्यात्मिक भावानुभूतींना हास्यास्पद चमत्कार संबोधणे, अशा प्रकारचे अवैचारिक नास्तिक कार्य या दोघा मंडळींनी म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि प्रा. शाम मानव या दुकलीने केले. पुढे जाऊन वैज्ञानिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बाबा-बुवा घोषित करण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली. 

खरे तर आध्यात्मिक अधिकारी संतांना त्यांचे भक्त पितृभावातून ‘बाबा’ हा शब्दप्रयोग करत असतात. धर्म, अध्यात्म यांवर कीर्तने करणार्‍यांना आदर देण्यासाठी त्यांच्या नावाच्या शेवटी बुवा लावतात. मात्र अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी हे बाबा-बुवा शब्द भोंदू-दांभिकांसाठी वापरून कलंकित केले. 

येथे सांगायचा मुद्दा हा की, विरोध सनातन संस्थेचा डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला नव्हता, तर डॉ. दाभोळकरांच्या अंनिसचा सनातन संस्थेला विरोध होता, हे आमच्या विरोधकांनी प्रथम लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी वृत्तपत्रांतून सनातन संस्थेला विरोध करण्यासाठी जी अपकीर्ती केली, त्यासाठी आम्ही त्यांच्यावर न्यायालयीन खटले घातले. अशा प्रकारच्या कृतीला विरोध म्हणत नाहीत, ते डॉ. दाभोलकरांना सवैवधानिक मार्गाने दिलेले उत्तर होते. 

डॉ. दाभोलकर हे डॉक्टर होते, संपादक होते, समाजसुधारक होते वगैरे सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित होते. परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की, ते हाडाचे नास्तिकतावादी आणि हिंदु धर्मविरोधक होते. त्यांची पुस्तके आणि भाषणे हिंदु धर्मविरोधी विचारांनी भारलेली होती. 

खुद्द डॉ. दाभोलकर त्यांच्या ‘भ्रम आणि निरास’ या पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे की ‘‘हिंदूंची अध्यात्मनिष्ठा व्यवहारात अंधश्रद्धांनाच खतपाणी घालते. हिंदूंचे कर्मकांड, ध्यानधारणा, होमहवन, पूजाअर्चा, मंत्रतंत्र, हे अंधश्रद्धांचे दृश्यस्वरूप आहे.’’

यावरून हिंदूंचे ईश्वरीय आराधना किंवा धार्मिक कार्य हेच त्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धा होते !

याच पुस्तकात डॉ. दाभोलकर लिहितात की, ‘‘धर्मशास्त्र प्रमाण मानणारे लोक ईश्वर मानतात; पण ते केवळ हायपोथेसिस (गृहितक) आहे.’’

यावरून ईश्वरवादी कल्पनाच त्यांना मान्य नव्हती, हे स्पष्ट होते. म्हणून आम्ही त्यांना निरीश्वरवादी होते असे म्हणतो . 

सनातन धर्मात प्रत्येकाला स्वतःचे विचार जोपासण्याची मोकळीक आहे. त्यामध्ये विचारांच्या स्तरावर मतभेदही असू शकतात. डॉ. दाभोलकर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सरकारच्या साहाय्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि नरबळी प्रथा विरोधी कायदा’ करण्याचा प्रयत्न करत होते. यात अनिष्ट रूढींच्या निर्मूलनाला कोणाचाही विरोध नव्हता; मात्र त्या नावाखाली हिंदु धर्मातील अनेक श्रद्धांना गुन्हा ठरवण्यास सनातन संस्थेचा विरोध होता. डॉ. दाभोलकरांनी कायद्यातील कलमे करतांना मुद्दाम त्यान्वये केवळ हिंदु धर्मातील धर्माचरणावर बंदी येईल, अशाप्रकारे रचलेली होती. उदाहरणार्थ त्यात एक कलम होते की, ‘कोणत्याही मूर्तीसमोर बळी देणे, हा अंधश्रद्धेचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला शिक्षा म्हणून ५ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड होईल.’ यावर आमचा आक्षेप होता की, कायद्यातील समानता या तत्त्वाने कोणत्याही प्राण्याची कोणत्याही कारणाने हत्या करणे गुन्हा मानले गेले पाहिजे, फक्त मूर्तिसमोर बळी देण्यालाच गुन्हा ठरवणे अयोग्य आहे; कारण केवळ हिंदू समाजच मूर्तिपूजक आहे, त्यामुळे मूर्तीसमोर बळी दिल्यामुळे हिंदू समाजावर कारवाई होईल आणि ईदची कुर्बानी म्हणून करोडो पशूंची हत्या करणारे मात्र त्याखाली येणार नाहीत. तसेच चिकन-मटण दुकानांमध्ये प्रतिदिन लाखो-करोडो प्राण्यांची हत्या करणारे मात्र गुन्हेगार ठरणार नाहीत ? म्हणजे एकाच कृतीसाठी हिंदू समाजालाच गुन्हेगार ठरवायचे; मात्र इतरांना नाही, हे अयोग्य आहे ! अशा हिंदूविरोधी कलमांमुळे  त्या कायद्याला सनातन संस्थेने विरोध केला. 

थोडक्यात डॉ. दाभोळकर यांच्या हिंदुविरोधी कृत्याला आम्ही लोकशाही मार्गाने विरोध केला. नास्तिकतावादाचा प्रचार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू असला, तरी त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्याचे सत्यस्वरूप लाेकांच्या पुढे उघड करण्याचे एक मोठे कार्य सनातन संस्थेने केले होते. डॉ. दाभोलकरांची हत्या झाली नसती, तर त्यांना निश्चितच आतापर्यंत तुरुंगात जावे लागले असते. सनातन संस्थेने त्या दृष्टीने त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले होते; मात्र दुर्दैव आहे की, या प्रकरणात सनातन संस्थेने पुरोगाम्यांचा बुरखा फाडण्याचे केलेले कार्य जाणून न घेता संस्थेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ मानव कल्याणकारी आहे असा प्रचार अंधश्रद्धा निर्मूलन आदी करत असतात दुसरीकडे अनेक आध्यात्मिक संस्था मानव कल्याणासाठी धर्म श्रद्धेचा प्रचार करतात त्यामुळे सामान्यांच्या मनात भ्रम निर्माण होतात याविषयी आपल्याला काय म्हणायचे ?

धार्मिक क्षेत्रांत खोटारडेपणा, ढोंगीपणा किंवा भोंदूगिरी अशी दांभिकता नाही, असे आमचे म्हणणे नाही. ती पूर्वीही होती आणि आजही आहे. ‘मनात एक, ओठात एक आणि कृतीत भलतेच’, अशा प्रकारच्या दांभिकतेचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. कुठल्याही सश्रद्ध व्यक्तीचा दांभिकतेला विरोध असतो. आम्ही स्वतः अध्यात्माचा प्रसार करणार्‍या, म्हणजे श्रद्धासंवर्धन चळवळीतील कार्यकर्ते आहेत. या चळवळीने नेहमीच दांभिकतेचा निषेध केला आहे. सनातन संस्था म्हणून आम्ही भोंदूबाबांच्या दांभिकपणाविषयी ४ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. समाजातील दांभिकता, भोंदूगिरी, अनिष्ट प्रथा आणि अयोग्य रूढी यांचे निर्मूलन आवश्यकच आहे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

समाजात माजलेल्या दंभाचे निर्मूलन करण्यासाठी भक्तीयोगातील संतांनी केलेले अमूल्य कार्य हे सर्वविदित आहे. आद्यशंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञान सांगतांना ‘ब्रह्म हे सत्य आहे आणि जग ही माया आहे’, असे सांगितले. त्याच शंकराचार्यांनी प्रसंगी अघोरी प्रथांचा अवलंब करणार्‍या कापालिकांचा नाश करण्यासाठी संन्याशांना एकत्र केले होते. संत ज्ञानेश्वरमाऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज या सर्वांनीच त्यांच्या समाजातील दांभिकतेवर प्रहार केले.

हे सर्व सांगायचे तात्पर्य, श्रद्धेचा प्रसार करणार्‍या संतांनाच चांगल्या प्रकारे दांभिकतेचे निर्मूलन करता येते; कारण भाव आणि श्रद्धा कळण्यासह त्यांना भोंदूपणा आणि दंभ यांचे उत्तम ज्ञान असते. आज मात्र ही चळवळ दुर्दैवाने धर्म न मानणार्‍या लोकांच्या हाती गेली आहे. ज्यांना ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे वाटते, ज्यांना समाजात नास्तिकतावाद पसरवायचा आहे, ज्यांच्या संघटनेचे पूर्वाश्रमीचे नाव ‘मानवीय नास्तिक मंच’ होते, ती मंडळी आज ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाने नास्तिकवादाचा प्रसार करणारी श्रद्धाविरोधी चळवळ राबवत आहेत. ‘श्रद्धेचा प्रसार करणार्‍या संतांना तुरुंगात टाकू’, अशा धमक्या उघडपणे देणार्‍या नास्तिकांना शासन राजमान्यता देत आहे. त्यांनी सांगितलेले कायदे करत आहे. हे चित्र भयावह आहे.

आम्ही समाजाला सांगू इच्छितो की, धर्म ही अफूची गोळी मानणारे हे व्यक्तींशः नास्तिकतावादी आहेत. त्यांचा सामाजिक विचार अंधश्रद्धा निर्मूलनाचा किंवा आधुनिकतावादाचा आहे आणि त्यांचा राजकीय विचार हा कम्युनिस्टांचा आहे. ते शारीरीक पातळीवर संघर्ष करतात, तेव्हा ते नक्षलवादी ठरतात आणि हीच मंडळी जेव्हा बौद्धीक पातळीवर संघर्ष करतात, तेव्हा अर्बन नक्षलवादी ठरतात.

म्हणूनच समाजाला आवाहन करीन की, धर्म न मानणार्‍या चळवळीं पासून समाजाने दूर रहावे; कारण ती चळवळ केवळ धर्मविरोधी नाही, तर देशविरोधीही आहे ! 

 सनातन संस्थेवर झालेल्या आरोपांच्या मुळे सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या कार्यावर काय परिणाम झाला ? आणि पुढे येणाऱ्या काळात आपण ह्या पुढील आवाहनांना कसे सामोरे जाणार आहात ?

सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की, युगानुयुगे निरीश्वरवादी आणि ईश्वरवादी यांच्यात वाद-विवाद-संवाद चालू आहेत. आजच्या प्रसारमाध्यमीय भाषेत निरीश्वरवाद्यांना ‘पुरोगामी’ म्हटले जाते, तर ईश्वरवाद्यांना ‘सनातनी’, असे हिणवले जात आहे. आमच्या भाषेत हा वैचारिक संघर्ष सश्रद्ध आणि नास्तिक लोक यांमधील आहे. आणि तो नैसर्गिक आहे, असे आम्हाला वाटते. जेथे रामकृष्णादी अवतार आणि ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज आदी संतांना यांना विरोध झाला, तसा सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला विरोध होणे स्वाभाविक आहे. 

ज्यांचे तत्त्वज्ञान आणि कार्य काळाच्या कसोटीवर टिकणारे असते, ते कालौघात वाढते किंवा टिकते, आणि ज्यांचे नसते, ते कार्य लयाला जाते. आज त्याचा अनुभव सनातन संस्था घेत आहे. 

मी थोडा इतिहास सांगतो. १९९० च्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सनातन संस्था या दोन्ही संस्था जन्माला आल्या. आज ३ दशकांनंतर या दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढाव घेतला, तर लक्षात येईल, कोणाचे कार्य काळाच्या कसोटीवर टीकले आहे. 

आज सनातन संस्थेचे कार्य देशभर पसरले आहे, तर अंनिसचे काय केवळ पश्चिम महाराष्ट्रातपुरते आहे. सनातनच्या कार्यातून हजारो पूर्णवेळ धर्मप्रचारक बनले, तर अंनिसचे किती पूर्णवेळ कार्यकर्ते झाले, हा शोधाचा विषय आहे. सनातन संस्थेच्या प्रचारासाठी कुठल्याही राजकीय पक्षाचे साहाय्य नव्हते; पण अंनिसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील-भाकप-माकप हे कम्युनिस्ट पक्षांचे नेते होते. सनातनच्या धर्म सभांना मोठी उपस्थिती व्हावी; म्हणून चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना बोलावण्याची गरज सनातनला कधीच भासली नाही; पण अंनिसच्या कार्यक्रमांना उपस्थितीसाठी मराठी चित्रपटसृष्टीतील निळू फुले, डॉ. लागू अशांना ‘ब्रॅंड’ बनवावे लागले; परंतु तरीही या कार्यक्रमांना संख्यात्मक यश मिळाले नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सनातन संस्थेच्या धर्मसभा ऐकल्या जातात. 

जीवनात श्रद्धेचे महत्त्व काय आहे, हे डॉ. दाभोळकरांना माहीत नव्हते. ‘श्रत् सत्यं धीयते यस्यां सा श्रद्धा ।’ ‘श्रत् म्हणजे सत्य. ज्या भावनेत सत्याचे अधिष्ठान आहे, ती श्रद्धा.’ अशा सत्याधिष्ठित श्रद्धेतूनच निष्ठा तयार होते. त्यातून निष्ठावान अनुयायी कार्यकर्ते, तयार होतात. परंतु अशा श्रद्धेच्या अभावी अंनिसला निष्ठावान कार्यकर्ते कधीच मिळाले नाहीत. प्रथम प्रा. शाम मानव महाराष्ट्र अंनिसपासून म्हणजे डॉ. दाभोळकरांपासून दूर झाले, नंतर आता डॉ. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र अंनिसमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे चळवळ वाढण्यापेक्षा दुभंगतच अधिक गेली. याउलट सनातन संस्थेमध्ये श्रद्धायुक्त आचरण शिकवल्याने हजारो धर्मनिष्ठ साधक घडले. संस्था कधीही दुभंगली नाही, तर वृद्धींगत झाली. 

त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर जो काही विरोध झाला, त्यातून आम्ही तावूनसुलाखून अधिक तेजस्वी झालो. श्रद्धायुक्त आचरण आणि धर्मनिष्ठा यांच्यामुळे धर्मकार्यावर काय परिणाम होईल, याचा विचार न करता आम्ही सनातनचे साधक अहंनिशं सेवामहे या तत्त्वाप्रमाणे सनातन धर्माची सेवा करत आहोत. सनातन धर्माचे मानवजातीच्या कल्याणाचे कार्य आम्हा सनातनच्या साधकांच्या हातून सदैव होत राहील, हे दृढ श्रद्धेने आम्ही तुम्हाला सांगतो.  

शेवटी एवढेच आवाहन करू इच्छितो की, प्रत्येकाने श्रद्धावान जीवन जगावे. श्रीमद्भगवद्गीता सांगते की, ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।’ म्हणजे ‘श्रद्धेने  ज्ञानप्राप्ती, म्हणजेच प्रत्यक्ष मोक्षप्राप्ती होते. असे आहे, तर इतर गोष्टींची काय कथा ? सर्वजण श्रद्धायुक्त जीवन जगाल, अशी आशा करतो. 

संकलन : श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था