“गुठली रिटर्न्स” उपक्रमासाठी अॅमनोरा स्कूलची साथ

पुणे, जुलै – वृक्ष लागवडीसाठी आंब्याच्या कोयी गोळा करून शेतकऱ्यांना मदत करणे या “गुठली रिटर्न्स”  उपक्रमाचे लक्ष्य आहे.विद्यार्थ्यांनी आंबा खाऊन झाल्यानंतर त्याच्या कोयी जपून ठेवाव्यात यासाठी अॅमनोरा स्कूलकडून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे व पर्यावरण रक्षणाच्या या कार्यामध्ये योगदान दिले जात आहे. अॅमनोरा स्कूलने ‘गुठली रिटर्न्स’ या कौतुकास्पद प्रोजेक्‍टसाठी मिशन ग्रीन या स्वयंसेवी संस्था तसेच रेड एफएमशी भागीदारी केली आहे. 

अॅमनोरा स्कूलमधील विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प मोठ्या उत्साहाने हाती घेतला असून त्यांनी तब्बल १,६०० कोयी अर्थात “गुठली” गोळा केल्या आहेत. या कोयी रेड एफएमच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाच्या महत्त्वाविषयीचे आपले विचार मांडले. या सहयोगाच्या माध्यमातून अॅमनोरा स्कूल, मिशन ग्रीन आणि रेड एफएमने सकारात्मक पर्यावरणीय बदलाचे बीज रोवले आहे.

“गुठली रिटर्न्स”चे हे चौथे पर्व असून अॅमनोरा स्कूल या उपक्रमामध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहे. प्रकल्पाच्या वेळापत्रकाच्या उत्तरार्धामध्ये शाळा या उपक्रमामध्ये स्वेच्छेने सहभागी व त्याबरोबरच शाळेने ग्रीन मिशन या स्वयंसेवी संस्थेबरोबरही आपल्या भागीदारीचा शुभारंभ केला.

या लक्षणीय कार्याच्या तयारीसाठी अॅमनोरा स्कूलने प्रकल्पाची उद्दीष्ट्ये समजून घेतली आणि ती पालक व विद्यार्थ्यांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचवली. वेळोवेळी संस्मरणे पाठवून आणि उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांचे काम कसे चालू आहे याचा आढावा घेत शाळेने या उपक्रमाविषयी जागरुकता निर्माण केली व मुलांच्या मनात याविषयी रुची निर्माण केली. आंब्याच्या कोयी गोळा करून, धुवून वाळविण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यांना या कोयी गोळा करण्यासाठी कलेक्शन बिन्स पुरविण्यात आली आणि त्यानंतर या कोयी एमएम स्टेशनकडे पोहोचविण्यात आल्या.

या सामुदायिक मोहिमेमध्ये शाळेच्या सर्व इयत्तांमधील मिळून एकूण १,२०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला व या कार्याप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली.

गोळा करण्यात आलेल्या कोयी ग्रीन मिशन संस्थेशी जोडलेल्या ४८ रोपवाटिकांमध्ये वितरित करण्यात आल्या, जिथे त्यांच्यापासून रोपे तयार करण्यात आली. एका वर्षानंतर जेव्हा ही रोपे लावण्यासाठी तयार होतील तेव्हा ग्रीन मिशन कृषी विभागाशी सहयोग साधेल. विभागाने आर्थिक भार असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सुमारे २,००० कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. ही रोपे या शेतकऱ्यांना लावण्यासाठी दिली जातील व सामंजस्य करारावर सही केल्यानंतर विभाग त्यांना यासाठी जमीन उपलब्ध करून देईल.

गेल्या वर्षी सुमारे ७० हेक्टर्स जमीन वापरात आणली गेली आणि ६४,००० रोपे शेतकऱ्यांमध्ये वितरित करण्यात आली. यावर्षी १००,००० आंब्याची झाडे लावण्याचे लक्ष्य ग्रीन मिशनने निश्चित केले आहे. हे एक असे लक्ष्य आहे, जे पर्यावरणावर लक्षणीय प्रभाव टाकेल आणि अनेक शेतकऱ्यांना आधार देईल. या उपक्रमामध्ये सहभागी होणे ही अॅमनोरासाठी अभिमानाची गोष्ट आहे व यापुढेही सातत्याने आपला सहभाग नोंदवत अधिक हिरव्या आणि अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने काम करण्यास शाळा उत्सुक आहे.