आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करावीत, अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना तात्काळ मद्य आणि मांसाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश पांढरे आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सिद्धता पहाण्यासाठी आणि आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आले होते. त्या प्रसंगी ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
या संदर्भात श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वास्तविक यापूर्वी अनेक वेळा हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांनी पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण यांसह सर्व तीर्थक्षेत्र मद्य-मांस मुक्त असावीत या संदर्भात निवेदन दिले आहे. वारकरी संप्रदायानेही या मागणीचा अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. केवळ यात्रा काळात असे बंदीचे आदेश निघतात त्याचेही पालन प्रशासन योग्य प्रकारे करत नाही. तरी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नोंद घेऊन प्रशासनास आदेश द्यावेत.’’ या प्रसंगी श्री. सुनील घनवट यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन वारकर्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली.