जीवनात आनंदी राहायचे असेल, तर गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनापासून नियमित साधना करण्याचा दृढ संकल्प करूया ! – सद्गुरू स्वाती खाड्ये
पुणे – सध्या बहुतेकांचे दैनंदिन जीवन हे धावपळ आणि चिंता यांनी ग्रासलेले आहे. मनःशांती हरवली आहे. ताणतणाव हा तर आयुष्याचाच एक भाग झाला आहे. शाळेत जाणारे अगदी लहान मूल असू दे किंवा कुणी वयोवृद्ध असू दे, आज जवळपास प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात ताण तणावाचा सामना करावा लागतो. आपण शिक्षण घेतांना इतिहास, भूगोल, गणित असे अनेक विषय शिकतो; पण आपल्याला आनंद कसा मिळवायचा ?, हे कुठेच शिकवले जात नाही. हे सर्व साधनेने शक्य होत असून या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनाच करायला हवी. मनःशांती, समाधान, आनंद या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत, तर त्या साधनेमुळेच मिळू शकतात. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म ! व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनापासून नियमित साधना करण्याचा दृढ संकल्प करूया असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाड्ये यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित ऑनलाइन सत्संगातून मार्गदर्शन करताना केले. देशभरात 75 ठिकाणी महोत्सव साजरा करण्यात आला. पुणे शहर,भोर आणि जुन्नर परिसरात 5 ठिकाणी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.
पूणे येथील वाढती बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी आणि ती रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना याविषयी ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी अश्वमेध हॉल, कर्वे रोड, एरंडवणे येथे उपस्थितांना संबोधित केले. श्री. विद्याधर नारगोलकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असलेले विविध आक्षेप आणि खंडन या विषयावर वाळवेकर लॉन्स, सातारा रस्ता येथे संबोधित केले.
सावरकरांचा हिंदुराष्ट्र विचार, सावरकरांची हिंदुराष्ट्राची संकल्पना आणि आजही त्याची कशी आवश्यकता आहे याविषयी स्वा. सावरकर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निलेश लोणकर यांनी श्री तुळजाभवानी सभागृह जुन्नर येथे उपस्थितांना संबोधित केले. अभिजित भवन मंगल कार्यालय भोर येथे ह.भ.प जाधव महाराज यांनी संबोधित केले. धारेश्र्वर बँकवेट,धायरी येथे अधिवक्ता मृणाल व्यवहारे यांनी संबोधित केले. समितीचे श्री पराग गोखले, श्री नागेश जोशी यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. स्व रक्षण प्रात्यक्षिके ही दाखवण्यात आली. तसेच अध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन, सात्त्विक उत्पादन कक्ष आणि धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला !