मंदिराचे सरकारीकरण टाळण्‍यासाठी विश्‍वस्‍तांनी नियमांचे पालन करावे !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त पुणे येथील अभिजीत जोग आणि अधिवक्‍ता दिलीप देशमुख यांचा सहभाग !
संस्कृतीवरील आक्रमकांचे मुखवटे ओळखून त्यांच्या विरोधात लढले पाहिजे !– अभिजीत जोग, व्यवस्थापकीय संचालक , ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशन
        स्वातंत्र्यानंतर इतिहास आणि शिक्षण यांवर साम्यवाद्यांचे प्रभुत्व राहिले आहे. भारताचे तुकडे करणे, हे साम्यवाद्यांचे धोरण राहिले आहे. त्यांनी भारताचे तुकडे करण्यासाठी इतिहास आणि शिक्षण यांची मोडतोड केली. वर्ष २०१४ मध्ये हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी हिंदु संस्कृतीला लक्ष्य करणे चालू केले. धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली संस्कृती नष्ट झाली, तर आपले अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे हे आक्रमण समजून घेतले पाहिजे. यासाठी त्यांचे मुखवटे समजून घेऊन त्यांच्या विरोधात लढले पाहिजे. शेवटी विजय आपलाच होणार आहे, असे प्रतिपादन ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत जोग यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त बोलत होते.
    या वेळी व्यासपिठावर स्वप्नील सावरकर (संपादक, हिंदुस्थान पोस्ट (डिजिटल मीडिया हाऊस), मुंबई, महाराष्ट्र), अभिजीत जोग (व्यवस्थापकीय संचालक , ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशन) मेजर सरस त्रिपाठी आणि हर्षद खानविलकर (युवा संघटक हिंदू जनजागृती समिती ) उपस्थित होते.
मंदिराचे सरकारीकरण टाळण्‍यासाठी विश्‍वस्‍तांनी नियमांचे पालन करावे !– माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश दिलीप देशमुख, पुणे
          मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरांचे व्‍यवस्‍थापन चांगले ठेवले, मंदिराशी संबंधित नियमांचे पालन केले, तसेच विश्‍वस्‍थांमधील अंतर्गत वाद टाळले, तर सरकारला कोणतेही मंदिर सरकारी नियंत्रणात घेण्‍याची संधी मिळणार नाही, तसेच त्‍यांचे मंदिर सरकारच्‍या ताब्यात जाण्‍यापासून वाचवता येईल, असे वक्‍तव्‍य माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश अधिवक्‍ता दिलीप देशमुख यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या पाचव्‍या दिवशी केले. ते ‘मंदिर व्‍यवस्‍थापनावर सरकारी नियंत्रण टाळण्‍यासाठी करायचे प्रयत्न’ या विषयावर बोलत होते. या वेळी त्यांनी मंदिरांचे सरकारीकरण रोखण्‍यासाठी काय करता येईल, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.