फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषद

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ : पत्रकार परिषद !

छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ! – श्री. उदय माहूरकर, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार

          दक्षिण गुजरात ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत १६०० किलोमीटर लांबीचे राज्य निर्माण करून मुघल राजवटीच्या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्ट्रनिर्माते होते; मात्र हिंदुविरोधकांनी त्यांचे महान कार्य दाबून त्यांना एक साधा मराठा योद्धा म्हणून इतिहासात दाखवले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता कमी करण्याचे काम चालू आहे. आपल्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य हिंदूंवर मुघलांचा उदात्तीकरण करणारा खोटा इतिहास लादण्यात आला, असे अनेक हिंदूविरोधी नॅरेटिव्ह आजही निर्माण करून हिंदूंमध्ये संभ्रम, भेद आणि न्यूनगंड निर्माण करून हिंदूंना निष्प्रभ केले जात आहे. याविरोधात हिंदूंनी आता जागे होऊन हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ओळखले पाहिजे. त्याचा अभ्यास करून या हिंदूविरोधी नॅरेटिव्हचा समाजासमोर भांडाफोड केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ संस्थापक, लेखक, इतिहासकार आणि भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी केले.
          ते फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेतील ‘हिंदूविरोधी नॅरेटिव्हला प्रत्युत्तर’ यावर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर उत्तर प्रदेश येथील ‘प्राच्यम्’चे संस्थापक तथा विचारवंत श्री. प्रविण चतुर्वेदी, हरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष तथा विचारवंत श्री. नीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते.
हिंदूविरोधी नॅरेटिव्हविषयी सांगतांना श्री. माहूरकर पुढे म्हणाले की, ‘हिंदूंना नॅरेटिव्हची (खोट्या कथानकाची) लढाई जिंकायला शिकावे लागेल. हिंदूंच्या सहिष्णु स्वभावामुळे, तसेच विजीगिषु वृत्तीच्या अभावामुळे ते नॅरेटिव्हच्या लढाईत नेहमीच हरत आले आहेत. हे स्वातंत्र्यापासूनचे चित्र आहे. वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या आधी गोध्रा येथे ज्या साबरमती रेल्वेमध्ये ५९ हिंदू मारले गेले; मात्र मा. नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी मुस्लिमविरोधी लाट आणण्यासाठी हे कृत्य घडवून आणल्याचे कम्युनिस्ट आणि इस्लामी रणनीतीकारांनी सांगितले. प्रत्यक्षात मुसलमान जमावाने रेल्वेचे डबे जाळल्याचे गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालात समोर आले.
      या वेळी ‘प्राच्यम्’चे संस्थापक तथा विचारवंत श्री. प्रविण चतुर्वेदी म्हणाले की, जो हिंदु धर्म प्रेम, करुणा आणि वैश्विक बंधुत्वाचे प्रतीक राहिला आहे. त्याची जगभरात बदनामी केली जात आहे. हिंदू युवकांमध्ये विशेषत: संभ्रम व एकमेकांबद्दल तिरस्कार भावना वाढीस लावण्यासाठी जातीयवाद, ब्राह्मणवादी पितृसत्ता असे शब्द तयार केले गेले आहेत. या खोट्या कथानकांचा प्रतिकार फक्त त्यांच्यातील खोटेपणा उघड करूनच करता येईल. उदाहरणार्थ आपल्याकडे जात ही संकल्पना नव्हती, फक्त वर्ण होते; मात्र ब्रिटिशांनी आपल्याला विभाजित करण्यासाठी जात पद्धती तयार केली. यापुढे जाऊन भारत, हिंदु धर्म, संस्कृती आणि हजारो वर्षांमध्ये सर्व क्षेत्रातील हिंदूंनी केलेले कर्तृत्व समाजापुढे मांडावे लागेल.
        विचारवंत श्री. नीरज अत्री म्हणाले की, विकृत कथनकाचा एक पैलू असा आहे की, पूर्णपणे अपयशी आणि विनाशकारी घटना देखील सामाजिक न्याय किंवा समावेशक म्हणून सादर केल्या जातात. याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मानवी शरीराचा नाश करणारी ‘जेंडर ॲफिर्मेशन’ नावाची प्रक्रिया ! यात उपचार म्हणून पूर्णपणे अवैज्ञानिक पद्धत मांडली जात आहे. आपला देश, आपला समाज आणि भावी पिढ्या सुरक्षित ठेवता याव्यात यासाठी सखोल अभ्यास आणि संशोधन करूनच योग्य माहिती पोहोचवणे ही माध्यमांची जबाबदारी आहे.