प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल !– शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग

       फोंडा – गोरक्षण करायचे असेल, तर प्रत्येक मंदिरात गोशाळा चालू करावी. इस्कॉनने महाराष्ट्रात २ गोशाळा चालू केल्या आहेत. अन्य काही देवस्थानांसोबत गोशाळा चालू करण्याविषयी आमचे बोलणे झाले आहे. असे केल्यास निश्चित गायीचे रक्षण होईल, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र गो सेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांनी केले. ते गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण’ या सत्रात ‘गोपालनाची आर्थिक नीती’ या विषयावर बोलत होते.

    या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मध्य प्रदेश राज्यातील हिंद रक्षक संघटनेचे इंदोर येथील अध्यक्ष श्री. एकलव्य गौडा, सर्व ब्राह्मण महासभेचे आंतरराष्ट्रीय संस्थापक पंडित सुरेश मिश्रा आणि राजस्थान येथील संयुक्त भारतीय धर्म संसदेचे अध्यक्ष आचार्य राजेश्वर उपस्थित होते.

    श्री. शेखर मुंदडा पुढे म्हणाले की, मनुष्याच्या मृत्यूनंतर जो अंत्यविधी करण्यात येतो त्यासाठी आम्ही गायीच्या शेणापासून सिद्ध होणारे ‘गोकाष्ट’ वापरण्याची संकल्पना पुढे आणली आहे. गोकाष्ट सिद्ध करण्यासाठी लागणारा साचाही आम्ही तयार केला आहे. या माध्यमातून विविध गोशाळांना आर्थिक साहाय्य होईल. गोमाता वाचली, तर देश वाचले. गोमातेला मानतो, तोच खरा हिंदू आहे. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा आहे; मात्र त्यावर कार्यवाही नव्हती. महाराष्ट्रात गो आयोगाची स्थापना झाल्यावर गोहत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले आहे. गो संगोपन, गो संरक्षण, गोशाळा, गो शेती, गो पर्यटन, गो साक्षरता यांवर काम करण्याची आवश्यकता आहे. यानुसार काम केले तरच गोमातेला मानाचे स्थान प्राप्त होईल. गायीची महती सर्वत्र पोचण्यासाठी आम्ही देशी गायीवर आधारित ‘जननी’ चित्रपटाची निर्मिती केली असून लवकरच तो प्रदर्शित होईल.