‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ : पत्रकार परिषद !
नेपाळविरोधी शक्तींकडून विरोध होत असला, तरी नेपाळ हिंदु राष्ट्राकडे अग्रेसर ! – श्री. शंकर खराल, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ
आज नेपाळमध्ये बहुसंख्य हिंदु समाज असला, तरी हिंदू मात्र चीन, युरोप युनियन आदी विदेशी शक्तींकडून मिळणारे अर्थसाहाय्यामुळे त्याच्या विचारांप्रमाणे कार्य करत आहे. तसेच भारतातील कट्टरतावादी डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापिठांमधून हिंदूविरोधी विचाराचे कार्यकर्ते हे नेपाळमध्ये येऊन हिंदूविरोधी तथा नक्षलवादी कार्य करत आहेत. तरी नेपाळमध्ये पूर्वीपेक्षा हिंदूसंघटन वाढले आहे. जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करतो, त्याला सर्व हिंदू पाठिंबा देत आहेत. नेपाळ जोमाने हिंदु राष्ट्रच्या दिशेने अग्रेसर होत आहे, असे प्रतिपादन नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी पत्रकार परिषदेत केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित ‘जागतिक स्तरावरील हिंदूंसंघटन’ या विषयावरील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर इंडोनेशियातील बाली येथील रस आचार्य डॉ. धर्मयश, अमेरिका येथील ‘इन्स्टीट्यूट ऑफ ॲडवान्स सायन्स’चे डॉ. नीलेश ओक, ‘युथ फॉर पनून काश्मीर’चे दिल्ली येथील अध्यक्ष श्री. विठ्ठल चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे उपस्थित होते. तर आफ्रीका येथील ‘इस्कॉन’चे श्रीवास दास वनचारी यांनी पत्रकार परिषदेसाठी स्वत:चा संदेश पाठवला होता.
सनातन धर्मामुळेच वैश्विक स्तरावर हिंदूंचे संघटन शक्य !
या वेळी अमेरिका येथील ‘इन्स्टीट्यूट ऑफ ॲडवान्स सायन्स’चे डॉ. नीलेश ओक म्हणाले की, हिंदू धर्मातील विज्ञानाला अंधश्रद्धा म्हणून, तसेच राम-कृष्णादी अवतारांना काल्पनिक म्हणून अपप्रचार केला जातो. प्रत्यक्षात आजच्या आधुनिक विज्ञानाच्या, खगोलशास्त्राच्या आधारे त्यांचा कालावधी निश्चित करता येऊ शकतो. त्यामुळे विज्ञानाच्या आधारे या अपप्रचाराचे उत्तर देणे आणि हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे सहज शक्य आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सनातन धर्म शिकण्याची सुरूवात आपल्या घरातून, विशेषत: लहान मुलांपासून केली पाहिजे.
या प्रसंगी इंडोनेशियातील बाली येथील रस आचार्य डॉ. धर्मयश म्हणाले की, आपली पुढची पिढी हेच आपले भविष्य आहे. त्यांना आपण भगवद्गीता, रामायण आणि वैदिक परंपरा यांचे शिक्षण देऊन प्राचीन संस्कृती शिकवली पाहिजे. मग आपण आपले चांगले भविष्य पाहू शकतो.
आफ्रीका येथील ‘इस्कॉन’चे श्रीवास दास वनचारी यांनी पत्रकार परिषदेसाठी आपल्या संदेशात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर हिंदु धर्म स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास केला जात आहे. भगवद्गीतेतील अद्भूत ज्ञान लक्षात आल्यानंतर घाना (दक्षिण अफ्रिका) येथील अनेक चर्चमध्ये फादरकडून गीतेचे ज्ञान दिले जात आहे.
या वेळी ‘युथ फॉर पनून काश्मीर’चे दिल्ली येथील अध्यक्ष श्री. विठ्ठल चौधरी म्हणाले की, आजही काश्मीरमध्ये लक्ष करून हिंदूंना ठार मारले जात आहे. काश्मीरनंतर आता आतंकवादी हल्ले हे जम्मूकडे सरकले आहेत. ‘पनून काश्मीर’च्या निर्मितीनेच काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन शक्य आहे. या ‘पनून काश्मीर’च्या स्थापनेत भारतीय आणि सनातन हिंदु धर्मीय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. काश्मीरच्या प्रश्नावर मागे ज्याप्रमाणे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन ‘एक भारत अभियान, चलो कश्मीर की ओर’, हे अभियान राबवले होते. ते पुन्हा एकदा राबवण्याची आवश्यकता आहे. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला हे मान्य करून सरकारने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाविषयी कृती केली पाहिजे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, भारत सोडून बाहेर गेलेले लोक पुन्हा भारताकडे वळत आहेत. अन्य धर्मीय लोक मोठ्या प्रमाणावर सनातन धर्माकडे वळत आहेत. केवळ भारतीय योग, अध्यात्म, आयुर्वेदच नव्हे, तर समृद्ध आणि परिपूर्ण सनातन भारतीय ज्ञानामुळे ते प्रभावित होऊन सनातन धर्माकडे आकर्षित होत आहेत. समाधान मिळवण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार आचरण करत आहेत. भारतीय संस्कृती ही जागतिक स्तरावरील सर्व धर्मियांना एकत्र आणू शकते. तिचा प्रसार करणे आवश्यक आहे; म्हणूनच हे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.