पुणे : “सर्वसामान्य करदात्यांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासह प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याचे काम कर सल्लागार करत आहेत. फेसलेस व ऑनलाईन प्रणालीमुळे करप्रक्रिया अधिक सुलभ व करदात्यांसाठी दिलासादायक झाली आहे. प्राप्तिकर विभाग व करदात्यांमधील दुवा साधण्याचे काम करसल्लागार संघटना करीत आहे,” असे मत पुणे प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त रीना झा त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रीना झा त्रिपाठी बोलत होत्या. विविध पुरस्कारांचे वितरण व पीएनबी मेटलाईट इंडिया इन्शुरन्सचे वरिष्ठ विभागीय प्रमुख कर्ण पालन यांचे ‘यशस्वीतेची कला’ यावरील व्याख्यान, सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण आदी कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन केले होते. सकाळी सत्यनारायण पूजेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शिवाजी रस्त्यावरील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ज्ञानमंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याच्या जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, वर्धापन दिन समिती चेअरमन माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, उपाध्यक्ष प्रसाद देशपांडे, सचिव ॲड. अनुरुद्र चव्हाण, सह सचिव प्रणव सेठ, खजिनदार मिलिंद हेंद्रे, माजी अध्यक्ष नवनीतलाल बोरा, मनोज चितळीकर, समन्वयक कैलास काशीद, उमेश दांगट, विनोद राहते, प्रकाश सुखात्मे, विजय उणेचा आदी उपस्थित होते.
सीए राजेश मेहता (इंदोर), सीए मितेश मोदी (सुरत), सीए महेश मालखोडकर (मुंबई), सीए संजय व्हनबट्टे (कोल्हापूर) यांना ‘एमटीपीए बेस्ट फ्रेंड ऑफ द इयर अवॉर्ड-२०२४’ने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील ऍड. विनायक आंबेकर, ऍड. विद्याधर आपटे, सीए सुबोध शाह, सीए प्रमोद शिंगटे व अतुल कुलकर्णी यांना ‘कोहिनुर ऑफ एमटीपीए’ सन्मान प्रदान करण्यात आला. ऍड. प्रवीण शिंदे (मुंबई), ऍड. उमेश झिरपे (पुणे), सीए ऋता चितळे (पुणे), राजकुमार भांबरे (परभणी) यांना ‘स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
अक्षय सोनजे (नाशिक), सीए वरदराज पंडित (रत्नागिरी), सीए ख्याती वासानी (मालाड), सीए उमेश माळी (सांगली) व सुभाष घोडके (पुणे) ‘एमटीपीए स्टार ऑफ द इयर २०२४’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीए प्रीतम माहुरे (पुणे) यांना ‘जीएसटी आयकॉन’, तर नेहा नाणेकर (पुणे) हिला ‘रायजिंग स्टार’ सन्मान प्रदान करण्यात आला.
रीना झा त्रिपाठी म्हणाल्या, “तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्याने करप्रणाली अधिक सुटसुटीत झाली आहे. मात्र, अनेक करदात्यांना कर भरताना अडचणी येतात. काही त्रुटी राहतात. परिणामी भविष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. हा संभाव्य त्रास टाळण्यासाठी कर सल्लागार मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करतात. देशाच्या करसंकलनात ‘एमटीपीए’सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे.”
धनंजय आखाडे म्हणाले, “वस्तू व सेवा कर प्रक्रियेत अधिकाधिक सुलभता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींच्या पुढे गेले असून, यामध्ये करसल्लागारांची महत्वाची भूमिका आहे. करसल्लागार लोकांना कर भरण्याची चांगली सवय लावून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्यासाठी करदात्यांना प्रोत्साहन देत आहेत.”