पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानच्या वतीने आयोजित संविधान अभ्यास वर्गाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. या अभ्यास वर्गामध्ये ‘निवडणूक आयोग,आचारसंहिता आणि लोकसभा निवडणूक’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.
शनिवार,दि.४ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह,पुणे येथे हा अभ्यास वर्ग झाला. ‘ युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे यांनी स्वागत केले. आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित हा नववा संविधान अभ्यास वर्ग होता. अन्वर राजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. अविनाश कोल्हे म्हणाले, ‘भारतातील लोकसभा ही मोठी प्रक्रिया असते.भारतात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग वेगवेगळ्या निवडणुका घेतात. भारतीय लोकशाहीत प्रचार ही लोकशिक्षणाची संधी असते. राजकीय पक्षांनी ती घेतली पाहिजे. सातत्याने निवडणुका होतात, हे भारतीय लोकशाहीचे मोठे यश आहे.आताची लोकसभा निवडणूक ही ‘ राज्यघटना धोक्यात ‘ या प्रचाराभोवती केंद्रीत होताना दिसते आहे. भाजपाप्रणित आघाडी पूर्वीइतक्या जागा मिळवणार नाही, असे दिसते आहे. भारतात एक आठवडा देखील वातावरण बदलायला पुरेसे असते, इथे तर अजून दोन आठवडे बाकी आहेत.
एखाद्या पक्षाचे ४०० खासदार निवडून आले तरी, राज्यसभेत दोन- तृतीयांश बहुमत आणि १४ विधानसभांचा पाठिंबा असल्या शिवाय राज्यघटनेत मोठा बदल घडवता येणार नाही.कोणतेही गैरकृत्य केले तर निवडणुकीत पराभव होईल, अशी मतदारांची नैतिक जरब लोकशाहीत असली पाहिजे. तितके लोकशिक्षण झाले पाहिजे,असेही प्रा. कोल्हे यांनी सांगितले. निवडणूक प्रचार नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे झाला पाहिजे, विरोधी पक्षांनी ठोस कार्यक्रम दिला पाहिजे,असेही ते म्हणाले.