Crime News : गुप्तधन शोधण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर; चोरांचा प्रताप पाहून पोलीसही हैराण!

Crime News : गुप्तधनाबद्दलच्या अनेक बातम्या आपण वारंवार पाहत किंवा ऐकत असतो. काहींना हा झटपट श्रीमंतीचा मार्ग वाटतो आणि कळत-नकळत ते चोरीकडे वळतात. जमिनीखाली खोलवर सोनं किंवा मौल्यवान लपलेले धातू शोधून काढण्याच्या लालसेने काही लोक आधुनिक धातू शोधक उपकरणे अर्थात मेटल सर्चिंग डिव्हाईसचा देखील उपयोग करत असल्याचं दिसून आलं आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा सध्या कित्येक ठिकाणी सुळसुळाट झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर गुप्तधन शोधून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीबद्दल कळताच यवतमाळ पोलिसांनी त्याचा छडा लावला आणि गुप्तधन शोधणाऱ्या 5 जणांच्या टोळीला जेरबंद केलं. यावेळी आरोपींकडून डीपसर्च मेटल डिटेक्टरसह 2 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुदे्माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळच्या बिटरगाव पोलिसांनी ढाणकी येथे केली. याप्रकरणी यवतमाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात जीवन गोविंद जाधव, संतोष हरीसिंग राठोड, अभिजीत गणेश मामीलवाड, सर्वजीत कांनबा गंगनपाड आणि पंडित विश्वनाथ राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा – हत्येपूर्वी डॉक्टरांना केलं टॉर्चर, पाळीव कुत्रा घेणार मारेकऱ्यांचा शोध?
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. अनेक शुभकार्ये पूर्ण करण्यासाठी हा दिवस निवडला जातो. या दिवशी पायाळू व्यक्तीच्या माध्यमातून धनाचा शोध घेतला तर गुप्तधन मिळविण्यात यश मिळते अशी काहींची मान्यता आहे. अनेक भागातील जुनी घरं, वाडे व शेतात पूर्वजांनी सुरक्षितता म्हणून जमिनीत पुरून ठेवलेले धनाचे हंडे व सोन्याच्या नाणी सापडल्याच्या चर्चा यवतमाळमध्ये सुरू होत्या. त्यातूनच गणेश मामीलवाड यांच्या शेतात धन असल्याच्या समजातून गुप्तधन काढण्यासाठी ही टोळी तिथं पोहोचली होती.

पोलिसांनी गणेश मामीलवाड यांच्या शेतात छापा मारला तेव्हा आरोपी घटनास्थळावर उपकरणांसह होते. या आरोपींकडून पोलिसांनी पंचासमक्ष डीप सर्च मेटल डिटेक्टर, मोबाईल फोन, दुचाकी वाहने, चाकू असा एकूण 2 लाख 8 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 3, महाराष्ट्री नरबळी, अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.