सनदी लेखापाल देशाचा आर्थिक आधारस्तंभ व मार्गदर्शक

पुणे: “इक्विटी मार्केटमध्ये स्थानिक गुंतवणूक वाढवायची असेल, तर छोट्या गावांतही याबद्दल जागृती व्हायला हवी. सनदी लेखापाल हा देशाचा आर्थिक आधारस्तंभ व मार्गदर्शक असतो. त्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक कशी व केव्हा करावी, याबाबत सहज, सोप्या व साध्या भाषेत सनदी लेखापालांनी मार्गदर्शन करावे. त्यातूनच राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अधिक गती प्राप्त होईल,” असे मत प्रसिद्ध झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक सीए अनिल सिंघवी यांनी व्यक्त केले.

‘आयसीएआय’च्या कमिटी ऑफ फायनान्शियल मार्केट्स अँड इनवेस्टर्स प्रोटेक्शन (सीएफएमआयपी) आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘इन्व्हेस्टमेंट की पाठशाला : सीए इज इन्व्हेस्टमेंट गुरु’ या विशेष कार्यक्रमात सीए अनिल सिंघवी बोलत होते. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे झालेल्या कार्यक्रमावेळी एसी लॅन्सडाऊनचे सहसंस्थापक सीए विक्रम कोटक, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, आयसीएआय पुणेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिनीयार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, खजिनदार सीए मोशमी शाह, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे, सीए राजेश अग्रवाल, सीए अजिंक्य रणदिवे, या परिषचे समन्वयक सर्वेश जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सत्राला ६०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, गुंतवणूकदार, व्यावसायिक, आर्थिक सल्लागार यांनी हजेरी लावली.

गुंतवणुकीतून संपत्ती मिळवण्याबाबत, तसेच यासंबंधित अनेक प्रश्नांवर सीए अनिल सिंघवी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारत झपाट्याने आर्थिक प्रगती करत आहे. गेल्या काही वर्षात स्टॉक मार्केटमध्ये मोठी प्रगती झाली आहे. यापुढील काळात स्टॉक मार्केटला आणखी चांगले दिवस येणार आहेत. सार्वजनिक क्षेत्र, फार्म, बांधकाम, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात तेजी राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी गुंतवणूक केली पाहिजे. एसआयपीसारखा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. बाजारात किंवा मानसिकतेत बदल करता येत नसेल, तर कृतीत बदल करायला हवा.”

सीए विक्रम कोटक म्हणाले, “भारतीय शेअर बाजारात मोठी क्षमता आहे. आपल्याकडे युवाशक्तीची मोठी संख्या आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर विकसित होत असून, जागतिक स्तरावरूनही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवली, आर्थिक बचत केली, तर भविष्यात त्याचा मोठा परतावा मिळणार आहे. सनदी लेखापालांमध्ये आर्थिक विश्लेषणाची क्षमता व अनुभव असतो. आपल्या क्लायंटच्या आर्थिक प्रगतीसाठी सीए गुंतवणुकीचे, बचतीचे अनेक पर्याय सुचवू शकतो. होणाऱ्या आर्थिक लाभाचे नियोजन करू शकतो. सीए हा प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करतो.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “विक्रम कोटक व अनिल सिंघवी यांनी सहज व सोप्या शब्दांत केलेल्या मार्गदर्शनाचा सर्व सनदी लेखापालांना फायदा होईल. यापुढील काळात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक व गुंतवणूकदारांची संख्या वाढवून आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी सर्व सीए काम करतील, असा विश्वास आहे.” सीए अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए मोशमी शाह यांनी आभार मानले.