भाजपा आमदार महेश लांडगे यांचे शिरुर मतदार संघात आवाहन

पिंपरी । विशेष प्रतिनिधी : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न ५०० वर्षांनी पूर्ण झाले. या मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. यानिमित्त देशभरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. देव-देश अन् धर्माभिमान जागृत करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणी, जम्मू-कश्मिरमधील ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राईक, जी-२० परिषद, कोविड संकटात देशाच्या आरोग्य व्यवस्थेची कामगिरी अशा विविध मुद्यांवर सर्वसामान्य नागरिकांना मोदी सरकारच्या १० वर्षांतील कामगिरीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, प्रभू श्रीराम हे भारतीयांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अयोध्या येथे मंदिर व्हावे. यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. न्यायालयीन लढा उभारला. कार सेवकांनी प्रसंगी बलिदान दिले आहे. १५ व्या शतकापासून आम्हा हिंदू बांधवांना या मंदिराची प्रतीक्षा होती. आमच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. ‘रामराज्य’ ही संज्ञासुद्धा प्रभू श्रीराम यांच्या प्रेरणेतून आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘रामराज्य’च्या आदर्शातूनच स्वराज्याची प्रेरणा घेतली. असे प्रभू श्रीराम यांचे जन्मभूमी मंदिरामध्ये आगमन  झाले. हा सोहळा पाहण्याचे भाग्य आपल्या पिढीला मिळाले. त्यामुळे संपूर्ण देश मोदींच्या सोबत आहे.