हेच ते गुंड; जे गेले तडीपार

कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत माजवणा-या केसरी गँगचा प्रमुख राहुल शिवाजी केसरी याच्यासह टोळीतील सदस्य अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते आणि चंद्रकांत बाबू आळेकट्टी (तिघे रा. आसरानगर, इचलकरंजी) या तिघांवर हद्दपारीची कारवाई झाली. इचलकरंजी पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावास पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंजुरी दिल्याने केसरी गँगमधील तिघांची एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर रवानगी झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, टोळीप्रमुख राहुल केसरी आणि त्याच्या साथीदारांवर इचलकरंजी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार समज देऊनही सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने इचलकरंजी पोलिसांनी टोळीच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. गडहिंग्लज उपविभागीय उपअधीक्षकांनी प्रस्तावाची चौकशी करून संशयितांना बाजू मांडण्याची संधी दिली.

चौकशीअंती सराईत गुन्हेगारांमुळे इचलकरंजी परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा अहवाल उपअधीक्षक राजीव नवले यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. त्यानुसार अधीक्षक पंडित यांनी तिन्ही गुन्हेगारांना ५ एप्रिलपासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. इचलकरंजी पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर सोडले.