पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘जप राम ‘ या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटरच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.
भरतनाट्यम नर्तक डॉ.परिमल फडके यांच्या विद्यार्थिनी सई शेटये,दीप्ती डोळे,तितली घटक,सायली देवधर,विद्या धिडे,रेवती खराडे,नीती नायर,अनुष्का देव यांनी नृत्य सादरीकरण केले.डॉ.परिमल फडके यांनी निवेदन केले.भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.भरतनाट्यम रचनांद्वारे रामायणातील काही महत्त्वाच्या घटनांना अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात एका अनवट रचनेने झाली. ज्यामध्ये कौसल्या छोट्या श्रीरामाच्या नर्तनाचे अति सुंदर वर्णन करते . पुढच्या रचनेत सीतेची सखी स्वयंवराच्या आदल्या दिवशी रामाला भेटते आणि सीता पहिल्या नजर भेटीत त्यांच्या प्रेमात पडली हे सत्य सांगते .रामाच्या विरहाचे उत्कट दर्शन वर्णम ह्या रचनेत घडले . वाल्मिकी रामायणातील राम विरहाचे सुंदर चित्रण या रचनेत होते . सीतेचे अपहरण झाल्याचे जटायूकडून कळते. हनुमान प्रभू रामाला भेटतात आणि सीतेला आश्वासनाचा संदेश देऊन लंकेला भेट देतात.अरण्यकांडातील अशा काही महत्वपूर्ण प्रसंगांचा समावेश या नृत्यरचनेत होता.हनुमानाच्या रामावरील भक्तीचा महिमा वर्णन करणाऱ्या रचनेने प्रेक्षक भारावून गेले.कार्यक्रमाची सांगता आगळ्या वेगळ्या रचनेनी झाली .‘अन्न हेच राम, कृष्ण आणि विठ्ठल ‘ याचे रूप आहे आणि ह्या अन्नातून मिळणारी अद्वैताची चव खरा भक्त चाखतो , असा भावार्थ त्यातून रसिकांपुढे आला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०२ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.