पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या नव्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे ज्येष्ठ विश्लेषक अशोक चौसाळकर यांच्याहस्ते होणार आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.संयोजन समितीच्या वतीने अन्वर राजन,संदीप बर्वे आणि जांबुवंत मनोहर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार मराठीत यावेत यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यातून ‘सत्याग्रह विचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.प्रथमावृत्तीचे प्रकाशन मामासाहेब देवगिरीकर यांच्याहस्ते झाले होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.महात्मा गांधींच्या विचारांचे सार या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे एकूण २० खंड आहेत.त्यातील चौथ्या खंडाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे.