‘जयंतस्मृति’निमित्त बुधवारी (दि. १७) डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान

पुणे: विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव स्वर्गीय जयंत सहस्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जयंतस्मृति’ व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, विवेक प्रकाशन आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी (दि. १७ एप्रिल) रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमईएस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम होत आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती’ यावर व्याख्यान, तर पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे माजी अध्यक्ष आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक लिखित विवेक प्रकाशन प्रकाशित ‘इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा’ या वैज्ञानिक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर याची विशेष उपस्थिती असणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) असणार असतील.

तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा होणार आहे. प्रसंगी विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, विवेक प्रकाशनचे व्यवस्थापक शीतल खोत आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजकांतर्फे डॉ. मानसी माळगावकर यांनी दिली.