पुणे: दहा वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या काळात परदेशातील काळा पैसा आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, लाखोंच्या हाताला काम देणार, पेट्रोल-डिझेल स्वस्त करणार अशा भल्या मोठ्या घोषणा भाजपने जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, त्यातील एकही घोषणा पूर्ण न करता मतदारांची दिशाभूल केली. यंदाच्या निवडणुकीत भाजप ‘अब की बार ४०० पार’चा नारा देत आहे. मात्र, जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला ‘अब की बार मोदी सरकार हद्दपार’ करण्याची खुणगाठ मतदारांनी बांधली आहे,” असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केला.
रोहन सुरवसे-पाटील म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षांत देशामध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली. विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये गरूड झेप घेतली, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २१ कलमी कार्यक्रम राबवून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविल्या. मात्र, काँग्रेसने ७० वर्षांत काहीच केले नाही, हा एककलमी कार्यक्रम मोदींनी राबविला. इंदिरा गांधींच्या २१ कलमी कार्यक्रमाच्या योजनांची नावे बदलण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. ईडी, सीडीचा गैरवापर करून विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. अशा सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. देशभरातील मतदार आता जागा झाला असून, मोदी सरकार हटविण्यासाठी मतदारांनीच एक पाऊल पुढे टाकले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.