“मागील तीन महिन्यांपासून यूट्यूब चैनलवर ‘मध्यमवर्गीयांचा आवाज’ नावाने मध्यमवर्गीयांच्या मनातील प्रश्न हे पुणेकरांसमोर मांडले आहेत. त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मध्यमवर्गीय माणसाला सन्मानाने जगण्यासाठी ठोस धोरणे बनवायला हवीत. राज्यात व देशात प्रति माणसी उत्पन्नवाढ, कररचनेतील बदल, शेतकरी व पिकविमा यातील तफावती संदर्भात माझी मते मांडली आहेत. त्याचा आराखडा आपल्याकडे आहे. तो मांडण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे. मागील पाच वर्षापासून पिकविमा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. अनेक शेतकऱ्यांना पिकविमा दावा का मिळत नाही? याबद्दल माझा अभ्यास आहे. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मला संसदेत जायचे आहे,” असे पुढे डॉ. संपगावकर म्हणाले.
पुण्याला उच्चशिक्षित खासदाराची गरज का?
नुसते विद्येचे माहेरघर म्हणून पुणे प्रसिद्ध नाही, तर एक महानगर म्हणूनही पुणे उदयास आले आहे. अनेक परदेशी कंपन्या गुंतवणुकीसाठी, प्रकल्प सुरु करण्यासाठी येतात, तेव्हा त्या ठिकाणचा खासदार कोण आहे, हेही पाहतात. पुण्याचा खासदार उच्चशिक्षित, औद्योगिक व अर्थशास्त्राचे ज्ञान असणारा असेल, तर त्यांना प्रकल्प सुरू करताना खासदाराची खूप चांगली मदत होते. नवीन उद्योग व उद्योगपती पुण्यात आणण्याकरिता पुण्याचा खासदार हा उच्चशिक्षित असावा. त्यामुळे युवकांचे रोजगाराचे प्रश्न, छोट्या उद्योगांचे प्रश्न सोडविणे शक्य होईल. शिक्षण व शैक्षणिक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी उच्चशिक्षित खासदारच चांगले काम करू शकतो, असा विश्वास डॉ. संपगावकर यांनी व्यक्त केला.
… तर सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोक मतदान करतील
सुशिक्षित मध्यमवर्गीय लोक मतदानासाठी बाहेर का पडत नाहीत, हा प्रश्न आपण सुशिक्षित लोकांचा विचारला, तर त्यांच्या मते, ‘ज्या माणसाला निवडून देतोय, तो माझ्यापेक्षा एकतर जास्त शिकलेला अथवा माझ्यापेक्षा जास्त हुशार असलेला पाहिजे. नाहीतर मी त्याला नेता का मानावे?’ अशी भावना त्यांच्या मनात असते. माझ्यासारखा सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित उमेदवार असेल, सुशिक्षित व मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील. पुण्यात होणाऱ्या एकूण मतदानापैकी केवळ ३० टक्के सुशिक्षित अथवा मध्यमवर्गीय मतदार बाहेर पडतात, हा इतिहास आहे. माझ्या उमेदवारीने हा वर्ग मतदानासाठी बाहेर पडेल व त्याचा लाभ थेट मला होईल, असा माझा विश्वास असल्याचे संपगावकर म्हणाले.
कोण आहेत डॉ. मिलिंद संपगावकर?
डॉ. मिलिंद संपगावकर सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबात मालेगावला जन्माला आलेले एक मध्यमवर्गीय आहेत. लहानपणापासून भिक्षुकी करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करून २००७ मध्ये पुण्यात आले. आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर पुणेकर झाले. २००७ ते २०१२ पुण्यात नोकरी करून २०१२ नंतर विमा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय केला. विश्वविक्रमवीर, मॅन ऑफ एशिया, भारतभूषण, भारतविभूषण, भारतश्री पुरस्काराने सन्मानित झाले. पद्मश्री २०२४ साठी नामांकन प्राप्त झाले. अर्थशास्त्रातील पीएचडी व विमा क्षेत्रातील डिलीटधारक म्हणून संपूर्ण भारतातील एकमात्र विमा प्रतिनिधी अशी ओळख आहे. पुण्यात सिद्धी असोसिएट्स नावाने व्यवसाय आहे. मध्यमवर्गीय विचार मंच, रिद्धी लेडीज विंग आदी संस्थांचे प्रमुख आहेत.
डॉ संपगावकर यांच्या मते विमा व गुंतवणूक संबंधित क्षेत्रात काम करणारे जवळपास 26 हजार कर्मचारी व प्रतिनिधी हे पुणे लोकसभा मतदारसंघात राहतात ते सर्व त्यांच्यातील पहिला पूर्ण वेळ गुंतवणूक प्रतिनिधी हा खासदार होऊन त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी सज्ज होत आहे त्यामुळे ते सर्व नक्कीच मदत करतील व त्यांनी प्रत्येकी 15 त्यांचे ग्राहक अथवा मित्र परिवारात डॉक्टर मिलिंद पिंपळगावकर साठी मते मागितली तरी तीन लाख 90 हजार असे चार लाख नव्वद हजाराचा टप्पा पार करणे सहज शक्य होईल