Crime News : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे कारखेलच्या चौघांनी सिनेमा स्टाईल्सने कोयता व कु-हाडीने वार करुन एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा निर्घूण खून केला. आरोपीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना आज (ता. १८ ) गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान घडली. विनोद प्रवीण भोसले (वय- १७ वर्षे )असे खून झालेल्या दुर्दैवी महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.
या घटनेतील चारही आरोपींना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये तिघेजन अल्पवयीन असून एकजण १८ वर्षाचा आहे. वैभव राजेंद्र भापकर (वय-१८) यश विलास मांढरे (वय-१७) सुमित आबासो भापकर (वय-१७) सुयश भानुदास भापकर (वय-१७) रा. सर्वजण कारखेल (ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारखेल (ता. बारामती) येथील विनोद प्रवीण भोसले (वय-१७) हा युवक श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पोलटेक्निकला इयत्ता बारावीमध्ये (सायको-संगणक) शिक्षण घेत होता. तो आज साडे पाच वाजता एस.टी. ने घराकडे येत होता.
उंडवडी सुपे येथे एस.टी. बसमधून उतरल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या पूलाखाली दबा धरुन बसलेल्या चौघांनी विनोद भोसले याच्यावर कोयता व कु-हाडीने थेट हल्ला केला. विनोद चौघांच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी जोर -जोरात ओरडत बाजूच्या शेताकडे पळाला. मात्र पळत असताना विनोदवर एक वार झाल्याने तो घायाळ झाला. आणि शेतात सापडला. मग चौघांनी विनोदवर सपासप कोयत्याने आणि कु-हाडीने वार केले.
यामध्ये विनोदचा जाग्यावरच मृत्यू झाला. घटनेनंतर चौघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चौघेही एकाच गावातील असून गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपसात किरकोळ वाद झाल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.