2024 वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सूर्यग्रहण सुरु झालं. आता हे ग्रहण 2 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. सूर्यग्रहणाचा कालावधी 5 तास 10 मिनिटं इतका आहे. आज सोमवार आणि त्यात अमवास्या असल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.
वर्ष 2024 मधील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. फाल्गुन महिन्यातील अमावस्येला हे ग्रहण लागलं आहे. चैत्र महिना सुरू होण्यापूर्वी लागलेल्या या ग्रहणाचं ज्योतिषशास्त्रात महत्त्व आहे. रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी हे ग्रहण लागलं आहे. सोमवारी हे ग्रहण आल्याने याचं महत्त्व वाढलं आहे. यापूर्वी असा योगायोग 54 वर्षांपूर्वी जुळून आला होता. म्हणजेच 1970 साली हे ग्रहण दिसलं होतं. सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे.पण भारतात सध्या रात्र सुरु आहे. त्यामुळे हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. तसेच सूतक कालावाधी पाळण्याची आवश्यकता नाही. ग्रहणाचा प्रभाव ज्या देशात दिसणार तिथेच होणार आहे. त्यामुळे वैदिक नियम पाळण्याची गरज नाही.
भारतातून हे ग्रहण दिसणार नसलं तरी हे वर्षातील सर्वात मोठं ग्रहण आहे. या ग्रहणाचा कालावधी 5 तास 10 मिनिटांचा आहे. खगोलशास्त्रानुसार जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. यावेळी सूर्य झाकला जातो तेव्हा त्याला संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. एकूण सूर्यग्रहणाचा कालावधी 3.5 मिनिटे ते 4 मिनिटे असेल.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या यूट्यूब चॅनलवर थेट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सूर्यग्रहणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालं आहे. अमेरिकेत सूर्यग्रहण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. कारण असे लांब आणि स्पष्ट सूर्यग्रहण येत्या 20 वर्षांत अमेरिकेत होणार नाही. आज होणारे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी मेक्सिकोपासून ते अमेरिका आणि कॅनडापर्यंत लाखो लोक वेळेपूर्वीच जमले आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी राहु आणि केतुचा प्रभाव असतो. त्यामुळे नकारात्मक उर्जा सक्रिय होतात.वर्षातील पहिले सूर्यग्रहण वृषभ, सिंह आणि मकर राशीसाठी शुभ ठरू शकते. तर मेष, मिथुन, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना विशेष खबरदारी घ्यावी लागेल, असं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे.