BIG NEWS : वसंत मोरे यांचा यू टर्न, राज ठाकरे यांची भेट घेणार, साहेब नाराज पण…
मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी राज ठाकरे यांचा फोन घेण्याचे टाळले. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की, “पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचेच नाही. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल.” असे वसंत मोरे म्हणाले होते. परंतु आता वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आपण राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
वसंत मोरे यांनी अनेक वर्षांचे मनसेशी असलेले नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो. काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू.
पुण्यात ना भाऊ, ना अण्णा, असे कोणाचे राजकारण चालणार नाही. आपलेच तात्यांचे (वसंत मोरे) राजकारण चालणार आहे. पुणेकरांचा विश्वास आपल्यावर आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ, असे वसंत मोरे यांनी सांगितले. वसंत मोरे 2007, 2012, 2017 अशा तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत मोरे पुणे महापालिकेवर मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.