Baramati : बातमी थेट बारामतीतून : रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज; राजकारणात नवा ट्विस्ट

Baramati : बातमी थेट बारामतीतून : रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज; राजकारणात नवा ट्विस्ट

बारामती लोकसभा मतदार संघात दररोज नवे ट्विस्ट येत आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सामना होणार आहे. पण त्यातच अजित पवार यांनी स्वतः महायुतीचे डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे येथील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. पण आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे बारामतीचे राजकारणाचा कोणताही नेम नसल्याचा दावा केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी ते वेगवेगळी रणनीती आखत आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पाटील व पुतणे युगेंद्र हे दोघेही सध्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे व अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या दोघीही येत्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पण तत्पूर्वीच रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवारांच्या अर्जात एखादी चूक झाली आणि त्यांचा अर्ज बाद ठरला तर खबरदारी म्हणून अजित पवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. हीच खबरदारी शरद पवार गटाकडूनही घेतली जाताना दिसून येत आहे. त्यानुसार सुप्रिया सुळे यांचा अर्ज बाद ठरला तर डमी उमेदवार म्हणून त्यांच्याजागी सुनंदा राजेंद्र पवार यांना प्राधान्य दिले जाईल. सुनंदा यांच्यातर्फे लक्ष्मीकांत खाबिया यांनी अर्ज खरेदी केला.

रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

दुसरीकडे, रोहित पवार यांनी डमी उमेदवारी दाखल करण्याच्या मुद्यावरून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असले तरी ऐकावे लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल, असे ते म्हणाले.

बारामतीसाठी 7 मे रोजी मतदान

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ व बारामती या 4 लोकसभा मतदारसंघांसाठी 7 व 13 ने अशा 2 टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी 12 ते 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत, तर 20 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.