गुरुग्राम, एप्रिल 2024: दिल्ली-दुबई या अत्यंत रहदारीच्या मार्गावर आपले नवीन A350 विमान तैनात करण्याची घोषणा एअर इंडियाने गुरुवारी केली. यामुळे कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये या विमानाचे पदार्पण होईल.
1 मे 2024 पासून, दिल्ली आणि दुबई दरम्यान उड्डाण करणारे एअर इंडियाचे प्रवासी A350 चा अनुभव घेऊ शकतात. AI995/996 या नंबरने ओळखले जाणारे हे विमान दररोज रात्री 20:45 वाजता दिल्लीहून निघेल आणि रात्री 22:45 वाजता दुबईला पोहोचेल. तर परतीचे फ्लाइट दुबईहून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00:15 वाजता निघेल आणि आणि पहाटे 04:55 वाजता दिल्लीला पोहोचते. उड्डाण आणि पोहोचण्याच्या सगळ्या वेळा या स्थानिक वेळेनुसार असतील.
यासह, भारत आणि दुबई दरम्यान A350 हे विमान चालवणारी एअर इंडिया ही एकमेव कंपनी बनली आहे.
दिल्ली-दुबई मार्गावरील A350 विमानातील जागा एअर इंडियाच्या वेबसाइट, मोबाइल ॲपवर किंवा ट्रॅव्हल एजंटद्वारे आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.
एअर इंडियाच्या A350 विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये पूर्ण-फ्लॅट बेडसह 28 खासगी सूट, प्रीमियम इकॉनॉमी केबिनमध्ये अतिरिक्त लेगरूम आणि इतर सुविधांसह 24 जागा तर इकॉनॉमी क्लासमध्ये 264 प्रशस्त जागा आहेत. A350 मधील सर्व सीट्सना आधुनिक Panasonic eX3 इन-फ्लाइट मनोरंजन प्रणाली आणि HD स्क्रीन आहे. यामुळे जगभरातील विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा जवळपास 2,200 तासांहून अधिक काळ आनंद घेऊ शकता.
एअर इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला A350s च्या वापरास सुरुवात केली. त्यांनी भारतामध्येच क्रू परिचय आणि नियम कळण्यासाठी विमाने उडवली आहेत.
दुबईला एअर इंडियाची सध्या आठवड्यातून एकूण 72 उड्डाणे आहेत. पाच शहरांमधून ही सेवा सुरू आहे. त्यापैकी 32 उड्डाणे दिल्लीहून आहेत.