Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. कारण पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राठवा यांनी काँग्रेसला रामराम करत कमळ हाती घेतला आहे. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अनेक समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते पहिल्यांदा 1989 मध्ये निवडून आले होते. त्यानंतर 1991, 1996, 1998 आणि 2004 मध्ये लोकसभेचे सदस्य झाले.
गुजरातमधील छोटा उदयपूर येथील आदिवासी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राठवा हे काँग्रेसमधून राज्यसभा सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे. ते पाच वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. पण त्यानंतर ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
नारायण राठवा यांचा मुलगा संग्राम सिंह यांनी देखील 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. आज त्यांनी वडील आणि आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नारायण राठवा 2004 मध्ये यूपीए सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राम सिंह राठवा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी राठवा यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा झटका आहे. सध्या भाजपकडून देशभरातील मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मोठे नेते आता भाजपमध्ये येत आहेत. नारायण राठवा हे त्यांच्या भागात काँग्रेसचा मोठा चेहरा होते. पण आता भाजपमध्ये आल्याने भाजपला देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे.
भाजपकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने जुन्या सहकारी मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी एक कमिटी बनवली आहे. ती कमिटी जुन्या सहकारी नेत्यांना भाजपसोबत आणण्याचं काम करत आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीत ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. तर एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. त्यामुळे ४०० चा आकडा गाठण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.