अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा निमित्त

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

      प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह श्रीरामाने केलेले कुशल संघटनकार्य ही महत्त्वाचे आहे. अचानक उद्भवलेल्या वनवासकाळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल वीरांचे संघटन करून असुरांचे निर्दालन करून त्या समस्यांचे निराकरण केले. वनवासाला निघतांना श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण असे तिघेच होते; मात्र रावणाचा वध करून अयोध्येला परत येतांना ते लंकाविजयात साहाय्य करणार्‍या सेनेसह आले. त्यामुळे हिंदु समाजाच्या दृष्टीने प्रभु श्रीरामाच्या या संघटनकार्याचे अध्ययन करणे आणि ते आचरणात आणणे आवश्यक आहे. प्रभु श्रीरामाचे अयोध्येतील मंदिर 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बनत आहे, अशा सुवर्णक्षणाच्या वेळी हिंदूंनी श्रीरामाच्या संघटनकार्याचा आदर्श घेतल्यास भारतभरातील अन्य आक्रमित मंदिरेही हिंदूंना मिळण्यास वेळ लागणार नाही.

वनवासात मित्र निषादराजाचे साहाय्य आणि त्याच्या प्रती कृतज्ञताभाव :

       माता कैकेयीने मागितलेल्या वरदानानुसार श्रीरामाने वनवासात जाण्याची सिद्धता केली. महर्षि वसिष्ठ यांच्या गुरुकुलात असतांना श्रीरामाची श्रृंगवेरपूरचा आदिवासी निषादराजा गुह याच्याशी अतिशय घनिष्ट मैत्री होती. अयोध्येतून बाहेर पडल्यावर निषादराजाला श्रीराम वनवासात निघाले असल्याचे कळल्यावर त्याने प्रभु श्रीरामाला स्वतःचे राज्य देऊन तिथेच रहाण्याची विनंती केली; मात्र श्रीरामाने वनवास धर्माचे पालनाचे कर्तव्य सांगून आता कोणत्याही नगरात प्रवेश करू शकत नसल्याचे सांगितले आणि त्याचे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. त्याच्या राज्यातील वनात वृक्षाच्या खाली पानांची शेज बनवून श्रीरामाने आपली वनवासातील पहिली रात्र निवास केला. तसेच याच ठिकाणी प्रभु श्रीरामाने राजवंशातील वस्त्रांचा त्याग करून वनवासाची वस्त्रे परीधान केली. निषादराजानेच भोई वंशाच्या केवटराजला बोलावून त्याच्या नावेतून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना गंगा नदी पार करवून दिली, तसेच स्वतः त्यांच्या वनवासाची व्यवस्था लावण्यासाठी सोबत केली. तेथून प्रयागराज येथील भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन श्रीरामाने वनवासातील निवासाच्या संदर्भात विचारणा केल्यावर भारद्वाज मुनींनी यमुना नदीच्या पलिकडे चित्रकूट पर्वतावर वनवासकाळातील निवास करण्यास सांगितले. तेव्हा श्रीरामाने निषादराजाला यमुना नदी पार करण्यासाठी बांबूची नाव बनवून देण्यास सांगितले आणि स्वतःच्या राज्यात परतण्यास सांगितले. त्यानुसार निषादराजाने आज्ञापालन केले. निषादराजाने वनवासात केलेल्या या साहाय्याचा प्रभु श्रीरामाला विसर पडला नाही, तर लंकाविजय मिळवून परत येतांना प्रभु श्रीरामाने पुष्पक विमान थांबवून निषादराजालाही राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोबत घेतले. त्यानंतरही अश्वमेध यज्ञाच्या वेळी निषादराजाला आमंत्रित करून मानाचे स्थान दिले होते. यातून आपल्याला साहाय्य करणार्‍याच्या संदर्भात कृतज्ञताभाव कसा असावा, याचा अादर्श प्रभु श्रीरामाने घालून दिला आहे.

श्रीरामाचे वनवासातील कार्य : वनवासकाळात श्रीरामाने विश्वामित्र, अत्रि, अगस्ती आदी ऋषी-मुनींच्या आश्रमांना राक्षसांच्या त्रासापासून कायमचे मुक्त केले. या काळात श्रीराम-लक्ष्मण यांनी अनेक राक्षसांचा वध करून वनातील सामान्यजणांनाही त्यांच्या आतंकातून मुक्त केले. साधारणपणे 12 वर्षे प्रभु श्रीराम वनवासात हे कार्य करत होते. याच काळात अत्याचारी राक्षसांच्या वधानंतर त्यांनी वनवासी समाजाला धनुष्य-बाण चालवण्याचे प्रशिक्षण देऊन शस्त्रविद्या शिकवली. त्यामुळेच आजही अधिकांश वनवासीजण धनुष्य-बाणाचा वापर करतांना दिसतात. श्रीरामाने त्यांना धर्म-परंपरा शिकवली, त्यामुळे आपल्याकडे वनातही आज राजपरंपरा दिसून येते, तसेच त्यांच्या रीती-रिवाजांमध्ये साम्य दिसून येते. या कार्यामुळे श्रीरामाला रावणाच्या विरोधात लढण्यासाठी वनातील सैन्याचे सहजपणे साहाय्य मिळाले.

सुग्रीवाला साहाय्य करणे :  किष्किंधा नगराचा वाली हा अतिशय पराक्रमी राजा होता आणि एका वरदानामुळे त्याच्याशी लढणार्‍या शत्रूचे अर्धे बळ त्याला मिळत असे. त्यामुळे त्याचा युद्धात सहजपणे विजय होत असे. त्याने देवतांनाही पराजित केलेल्या महापराक्रमी रावणाची मान काखेत दाबून संपूर्ण विश्वाची परीक्रमा केली होती. त्यामुळे रावणाने त्याच्यासमोर पराजय मान्य केला होता. या वालीने एका प्रसंगात झालेल्या गैरसमजामुळे स्वतःच्या भावाला, सुग्रीवाला राज्यातून बाहेर हाकलून दिले होते आणि त्याच्या पत्नीला, रूमाला बळजबरीने स्वतःकडे ठेवले होते. त्यामुळे सुग्रीवाने ऋष्यमुख पर्वताच्या ठिकाणी आश्रय घेतला होता.

       या ठिकाणी युद्धनीतीचा विचार केला तर लक्षात येते की, ज्या रावणाने सीताहरण केले होते; त्याच रावणाला वालीने सहजपणे पराजित केले होते. त्यामुळे श्रीरामाने जर वालीचे साहाय्य मागितले असते, तर रावणाने घाबरून सीतेला सहज परत केले असते. अशा स्थितीतही प्रभु श्रीरामाने अन्यायी वालीचे साहाय्य घेतले नाही, तर सुग्रीवाच्या पत्नीला बळजबरीने स्वतःकडे ठेवून घेणार्‍या वालीच्या विरोधात जाऊन अन्यायाने पीडित सुग्रीवाला साहाय्य करण्याचे ठरवले. यातून लक्षात येते की, श्रीरामाने बलवानाकडून साहाय्य न घेता, अन्याय झालेल्या सुग्रीवाच्या मदतीसाठी ते उभे राहिले. प्रभु श्रीरामाने अन्यायी वालीचा वध करून सुग्रीवाचा राज्याभिषेक केला आणि त्याला त्याची पत्नी पुन्हा मिळवून दिली; मात्र किष्किंधेचा राजकुमार म्हणून पराक्रमी वालीपूत्र अंगदची नेमणूक करून त्यालाही सोबत जोडून घेतले.

अंगदाच्या बुद्धीकौशल्याचा उपयोग करणे : राजकुमार अंगदने सीतेच्या शोधात वानरसेनेचे नेतृत्व केले. जटायुचा भाऊ संपातीकडून सीतामाता लंकेत असल्याचे ऐकून अंगद समुद्र पार करण्यास तयार झाला; परंतु तेव्हा तो समूहाचा नेता असल्याने जांबवंताने त्याला जाऊ दिले नाही आणि महाबली हनुमान लंकेला गेले. महाबली हनुमानाला त्या वेळी लंकेत पाठवण्याचे कारण म्हणजे, महाबली हनुमानने लंकेतील असुरांचाही नाश केला, सीतामातेला संदेश पोहोचवण्याचे कार्य केले तसेच लंकादहन करून असुर सैन्याच्या मनात दहशत निर्माण केली. त्यामुळे अनेक लाभ झाले.

      भगवान श्रीरामांचा अंगदच्या शौर्यावर आणि बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास होता, म्हणूनच त्यांनी राजकुमार अंगदला आपला दूत म्हणून रावणाच्या भेटीला पाठवले आणि त्याला सांगितले की, रावणाने सीतेला सन्मानाने परत केले, तर ते रावणाशी युद्ध करणार नाहीत. तिथे गेल्यावर रावणाने भेदभावाचा वापर करत अंगदला सांगितले की, ‘‘वाली माझा मित्र होता. याच रामाने वालीला मारले आहे आणि ज्यांनी तुझ्या वडिलांना मारले, त्यांचा तू संदेशवाहक म्हणून वागत आहेस, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे.’’ त्या वेळी राजपुत्र अंगदने रावणाला फटकारले आणि सांगितले – ‘‘मूर्ख रावणा, तुझ्या या शब्दांमुळे श्रीरामावर भक्ती नसलेल्यांच्या मनातच विसंवाद निर्माण होऊ शकतो. वालीने जो अन्याय केला, त्याचे त्याला फळ मिळाले. तूही काही दिवसांनी तेथे जाऊन यमलोकातील तुमच्या मित्राची विचारपूस कर.’’

         श्रीरामाच्या दूताच्या रूपात असलेल्या महाबली अंगदने रावणाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही. त्याने रावणाचा अहंकार दूर करण्यासाठी त्याला आठवण करून दिली की, पाताळात बळीराजावर विजय मिळवण्यासाठी गेल्यावर तेथे रावणाला बंदी बनवले होते, सहस्रबाहू राजानेही रावणाला बंदी बनवले होते, तसेच वालीनेही रावणाला काखेत दाबून ठेवले होते. त्यामुळे रावणाला पराभूत केले जाऊ शकते. आता तर साक्षात विष्णूचा अवतार स्वतः रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्रतीरावर सज्ज आहेत. त्यामुळे रावणाच्या अहंकाराने रावणाचा तर नाश हाेईलच; परंतु राजसभेत बसलेल्या सर्वांचा नाश होऊन त्यांची पत्नी-मुले अनाथ होतील. तेव्हा आताच रावणाचा पक्ष सोडून श्रीरामाला शरण या. हे ऐकून संतापलेल्या रावणाने अंगदाचे मस्तक छाटण्याचा आदेश दिला. त्या वेळी अंगदने प्राणविद्येचा वापर करून आपला पाय दरबारात जमिनीवर ठेवला आणि रावणाला आव्हान दिले की, ‘‘जर त्याच्या दरबारातील कोणत्याही शूर आणि बलवान योद्ध्याने माझा पाय जमिनीवरून हलवला, तर आपण पराभव स्वीकारू आणि श्रीराम युद्ध न करताच तेथून परत जातील.’’ मेघनाद आणि कुंभकर्णासह रावणाच्या अनेक मोठ्या योद्ध्यांनी प्रयत्न केले; परंतु कोणीही अंगदचा पाय जमिनीवरून हलवू शकले नाहीत. शेवटी रावण स्वतःच अंगदचा पाय हलवायला आला आणि त्याचा पाय धरला; पण अंगदने त्याचा पाय सोडवला आणि रावणाला तो म्हणाला, ‘‘रावणा, तू जसे माझे पाय धरले आहेस, तसेच श्रीरामाचे पाय धरले असते तर चांगले झाले असते.’’ यातून अंगदची विद्वत्ता, शत्रूच्या राजसभेत जाऊन त्याला हतोत्साहित करण्याचे कौशल्य, तसेच त्याच्या मनातील श्रीरामाच्या प्रतीचा अपार भाव लक्षात येतो आणि त्यातून श्रीरामाने त्याची दूत म्हणून केलेली निवडही समजते.

        श्रीरामाने अशा प्रकारे महाबली हनुमान, जांबवंत, नल-नील यांचेही सीतेच्या शोधार्थ साहाय्य घेतले आणि त्यांच्या गुणांचा योग्य उपयोग करून घेतला. विश्वकर्माचे पुत्र असणार्‍या नल-नील यांनी त्यांना मिळालेल्या वरदानाचा उपयोग करून लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बनवण्यासाठी साहाय्य केले.

रावणाचा बंधू बिभीषणाला आश्रय देणे आणि युद्धात त्याचे साहाय्य घेणे : बिभीषण हा रावणाचा सर्वात लहान भाऊ होता. तो राक्षसकुळात जन्मलेला असला तरी, श्रीविष्णूचा परम भक्त होता. त्याने रावणाला राजदरबारातील चर्चेत सांगितले की, श्रीरामाला शरण जाऊन सीतामातेला श्रीरामाकडे सोपवण्यातच त्याचे हित आहे. त्यामुळे रागावून रावणाने बिभीषणाला राज्यातून बाहेर काढले. तेव्हा बिभीषण आश्रय मागण्यासाठी श्रीरामाकडे आला. शत्रूचा भाऊ आश्रय मागण्यासाठी आल्यावर त्याच्या हेतूची खात्री करणे आवश्यक होते. त्यामुळे श्रीरामाने सर्वप्रथम हनुमानाचे मत विचारले. तेव्हा हनुमानाने लंकेत बिभीषणाची झालेली भेट आणि त्याची भगवद्भक्तीची माहिती देऊन बिभीषणाला आश्रय देण्यास सांगितले; मात्र जांबवंत, नल-नील इत्यादी मंत्र्यांच्या मनात संशय तसाच राहिल्याने श्रीरामाने त्यांचा संशय दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी श्रीरामाने त्यांना इतिहासातील उदाहरणे सांगून आश्रय मागायला आलेल्याला साहाय्य करण्याचे कर्तव्य समजावून सांगितले.

     श्रीरामाच्या या निर्णयामुळे बिभीषण हा शत्रूपक्षातील सर्व प्रदेशाची, शस्त्रांची आणि असुरांच्या सैन्याची, शक्तीची रहस्ये असणारा सहकारी बनला. त्यामुळे युद्धात त्याने प्रभू श्रीरामाला प्रत्येक वेळी योग्य ती मदत करून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.

      रावणाच्या वधानंतर लंका राजाविहीन झाली, तर तिथे योग्य राजा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन प्रभू श्रीरामाने लंकेचा पुढचा राजा म्हणून बिभीषणाची निवड केली. इतकेच नव्हे तर ‘मरणान्ती वैरानी…’ (अर्थ : मरणानंतर वैर संपते.) म्हणून स्वतः रावणाचा अंतिमसंस्कार केला. त्यामुळे लंकेतील सर्वांचे मनही श्रीरामाने जिंकले. भगवान श्रीरामांचे ध्येय लंकेची सत्ता काबीज करणे हे नव्हतेच. त्यामुळे लक्ष्मणाला सोन्याच्या लंकेची भुरळ पडल्यावर श्रीरामाने त्याला ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी’ (अर्थ : स्वर्गापेक्षा जन्मभूमी सर्वश्रेष्ठ आहे.) हे मार्गदर्शन करून मातृभूमीचे महत्त्व सांगितले. यातूनही श्रीरामाचे अद्भुत संघटन कौशल्य लक्षात येते.

पित्याची वनवासाची आज्ञा पाळत श्रीरामाचे लंकाविजयासाठी संघटन :खरे तर रावणाने सीताहरण केल्यानंतर श्रीरामाने जर अयोध्येतील सेना आणि उर्वरित भावंडांना साहाय्य मागितले असते, तर तिथे त्यांनी सहजपणे साहाय्य केले असते; मात्र वनवासात धनसंचय करायचा नसल्याने सैन्याचे वेतन, त्यांच्या युद्धसामग्रीचा खर्च आणि त्यांना लागणारे अन्न-धान्य हे पुरवता आले नसते. तसेच त्यामुळे पित्याला दिलेल्या वनवासाच्या वचनाचा भंग झाला असता. त्यामुळे प्रभु श्रीरामांनी वनातील वनवासी, वानर आदी जमातींशी जवळीक करून त्यांचे साहाय्य घेतले आणि त्यांचीच सेना उभारली. त्यामुळे या सेनेला भूक लागली की वनातील फळांचा आहार करण्याची सवय असल्याने आणि त्यांनी तेथील वृक्ष-दगड आदींचा सहजपणे शस्त्र म्हणून वापर केल्याने रावणाच्या सैन्याशी युद्ध करणेही शक्य झाले. यातून श्रीरामाने सीतामातेची सुटका करण्याचा आदर्श पतीधर्माचे पालन तर केलेच, त्यासह पित्याच्या वनवासाच्या वचनाचा भंग होऊ न देता आदर्श पुत्रधर्माचे आणि आचारधर्माचेही पालन केले.

     याद्वारे प्रभु श्रीरामाने वनवासातच कुशल संघटनाचा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे आपणही अशा प्रकारे संघटन उभे केल्यास, संघटनातील प्रत्येकाच्या कौशल्याचा उपयोग करून घेतल्यास रामराज्यरूपी हिंदुराष्ट्र पुन्हा साकार करणे कठीण नाही.

– संकलन : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती