श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि. २२) प्रभू श्रीराम महाआरती; शिवाजी माधवराव मानकर यांची माहिती; रामगीते, शंखनाद, रामायण नृत्याचेही सादरीकरण

पुणे : अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात येत्या सोमवारी (दि. २२ जानेवारी) विराजमान होत आहेत. श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला असून, हा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी सोमवारी (दि. २२) प्रभू श्रीराम महाआरती व अध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती आयोजक शिवाजी माधवराव मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ऍड. मंदार जोशी, अमित जाधव, विजय आढाव, यश वालिया, ऍड. नितीन साबळे, अभिजीत देशपांडे, राज जैन, सुरज शर्मा आदी उपस्थित होते.

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सोमवारी सायंकाळी ५ वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये या महाआरती व भव्यदिव्य कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महाआरतीसाठी चार ते पाच हजार रामभक्त येणार आहेत.”

बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंटतर्फे नवीन निफ्टी ५० इटीएफ आणि निफ्टी बँक इटीएफ फंड सादर

“ढोल-ताशा वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. गायक हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते, जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर होतील. शंखनाद, धुपआरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीने हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर अयोध्येतील शरयूतीरी आरती करणारा समूह गंगा घाट आरती करणार आहे. प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. प्रथमच ही गंगा महाआरती होत असल्याने अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहावे,” असे शिवाजी माधवराव मानकर यांनी नमूद केले.

ऍड. मंदार जोशी म्हणाले, “शिवाजी माधवराव मानकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा महाआरती सोहळा होत आहे. फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या माध्यमातून मानकर यांनी आजवर सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. भक्तीमय वातावरणातील या सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. फिरते शौचालय, अग्निशमन व्यवस्था, ऍम्ब्युलन्स याठिकाणी तैनात असणार आहे.”