बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंटतर्फे नवीन निफ्टी ५० इटीएफ आणि निफ्टी बँक इटीएफ फंड सादर

पुणे, १६ जानेवारी २०२४ : बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह निफ्टी फिफ्टी इटीएफ आणि बजाज फिनसर्व्ह निफ्टी बँक इटीएफ हे दोन नवीन एक्सचेंज ट्रेडेड फंड (इटीएफ) गुंतवणूकदारांसाठी आणले आहेत. हे फंड इटीएफ प्रकारात बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटच्या पहिल्याच फंड योजना आहेत. भारतीय शेअर बाजारातील दोन प्रमुख आधारभूत निर्देशांकांच्या कामगिरीचा मागोवा घेत कार्यक्षम आणि किफायतशीर गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणुकदारांना प्रदान करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने हे इटीएफ फंड बाजारात आणले आहेत. दीर्घकालीन भांडवल वाढीची इच्छा, निफ्टी फिफ्टी निर्देशांक आणि निफ्टी बँक इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या समभागांत गुंतवणूक करणे आणि बाजारात भविष्यात आघाडीच्या ठरु शकणाऱ्या कंपन्यांत प्रवेश करु पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या नवीन योजना योग्य पर्याय आहेत.

नवीन फंड १५ जानेवारीला प्रारंभिक गुंतवणूकीसाठी सुरु होणार आहे आणि १८ जानेवारी ला बंद होणार आहे. ही योजना २९ जानेवारी २०२४ ला पुनर्विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा सुरू होईल. दोन्ही इटीएफ २९ जानेवारीपासून बीएसई आणि एनएसई मंचावर खरेदी-विक्रीसाठी व्यवहारक्षम सिक्युरिटीज म्हणून उपलब्ध असतील. निधीचे व्यवस्थापन सोरभ गुप्ता आणि इलेश सावला हे संयुक्तरित्या सांभाळणार आहेत.

बजाज फिनसर्व्ह निफ्टी ५० इटीएफ आणि बजाज फिनसर्व्ह निफ्टी बँक इटीएफ फंड अनुक्रमे निफ्टी ५० आणि निफ्टी बँक निर्देशांकांच्या कामगिरीआधारे वाटचाल करणार असून ते वाटचालीतील त्रुटीच्या अधीन आहेत. या निर्देशकांना भारतीय शेअर बाजाराचा आरसा मानलो जातो, कारण त्यामध्ये विविध क्षेत्रातील मोठ्या-भांडवली कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या निर्देशांकांशी संलग्न इटीएफ सादर करत गुंतवणूकदारांना विविधांगी आणि पारदर्शक गुंतवणुकीचे मार्ग प्रदान करण्याचे बजाज फिनसर्व्ह एएमसीचे उद्दिष्ट आहे आणि ते बाजाराच्या वाटचालीशी मिळतेजुळते आहे.

बजाज फिनसर्व्ह निफ्टी ५० इटीएफ आणि निफ्टी बँक इटीएफ हे दोन्ही फंड एक्सचेंजमध्ये सहभागी अधिकृत घटकांद्वारे प्रदान केलेली तरलता सतत मिळवून देतात, त्याचबरोबर क्षणाक्षणाला नक्त मालमत्ता मूल्य किंवा सूचक एनएव्ही चा बारकाईने मागोवा घेण्यासारखे फायदेसुध्दा देतात. एक्सचेंजवर अल्प स्प्रेडमुळे ते प्रभावी स्प्रेड आणखी कमी करतात. या प्रभावी स्प्रेडमध्ये रोखे व्यवहार कर (एसटीटी) आणि ब्रोकरेजचा अंतर्भाव आहे.

फंडांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटचे सीईओ गणेश मोहन म्हणाले, निफ्टी फिफ्टी इटीएफ आणि निफ्टी बँक इटीएफ हे आमचे दोन पहिले इटीएफ फंड सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. निफ्टी फिफ्टी इटीएफ लार्जकॅप गुंतवणुकीचे पर्याय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करतो, तर निफ्टी बँक इटीएफ फंड, अग्रगण्य बँकिंग समभागांसह, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बँकींग क्षेत्रात सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना देतो. गुंतवणूकदारांच्या विविध गरजा पूर्ण करणार्‍या विविध गुंतवणूक पर्यायांच्या आमच्या समर्पणाला हे दोन्ही फंड मूर्त रूप देतात.”

बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटचे सीआयओ निमेश चंदन याप्रसंगी टिप्पणी करताना म्हणाले, “ हे इटीएफ फंड गुंतवणूकदारांना अधिक परवडणारी, नियमांवर आधारित, कोणतीही पूर्वाग्रह नसलेली धोरणे सादर करत गुंतवणूक अधिकाधिक सोपी-सुटसुटीत ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करतात. आमची अशी धारणा आहे की, निफ्टी बँक इटीएफ फंड बाजारात उतरविण्याची ही अतिशय उत्तम वेळ आहे, कारण बँकिंग क्षेत्र येत्या काही वर्षांत लक्षणीय वृध्दीसाठी तयार आहे. निफ्टी फिफ्टी निर्देशांकाने ऐतिहासिकदृष्ट्या आकर्षक परतावा दिलेला आहे आणि वैविध्यपूर्ण लार्ज कॅप पोर्टफोलिओसह शेअर बाजारात सहभागी होऊ पाहणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी निफ्टी फिफ्टी योग्य पर्याय ठरला आहे.”