पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्रेया चतुर्वेदी हिचा कथक रंगमंच प्रवेशाचा नृत्याविष्काराचा कार्यक्रम गुरुवार, दि. 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता निगडी, प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर ऑडिटोरियममध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट, पद्मश्री गिरीश प्रभुणे, कथक नृत्यगुरू पंडिता शमा भाटे, कथक नृत्यगुरू पंडित नंदकिशोर कपोते आणि कथक नृत्यगुरू पंडित राजेंद्र गंगाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रंगमंच प्रवेश हा कथक नृत्यशैलीचे शिक्षण घेणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. श्रेया हिने गुरू निवेदिता यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षांपूर्वी सिंगापूर इंडियन फाईन आर्टस् सोसायटीमध्ये कथक नृत्य शैलीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अलिकडेच तिने पंडित राजेंद्र गंगाणी यांचे शिष्य गुरू अफसरमुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाखाली कथक नृत्यातील विशारद पूर्ण केले आहे. सिंगापूरचे उपपंतप्रधान, सांस्कृतिक मंत्री आणि सिंगापूरचे विद्यमान राष्ट्रपती यांच्यासह भारतीय उच्चायुक्तांसह अनेक सन्माननिय सदस्यांशी संवाद साधण्याची संधी श्रेया हिला कथक कलेच्या माध्यमातून मिळाली आहे. रंगमंच प्रवेशाच्या परंपरेतून कला क्षेत्रात पुढचे पाऊल टाकण्यासाठी श्रेयाच्या आयुष्यात हा एक मोलाचा क्षण ठरणार आहे.
मुंबईत जन्मलेल्या श्रेयाने सिंगापूरमध्ये आपले शालेय शिक्षण घेतले असून सध्या ती पुण्यातील निगडी येथे वास्तव्यास आहे. कथक कलेच्या शिक्षणासह श्रेयाने शालेय शिक्षणातही अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेशी कथक नृत्याच्या माध्यमातून श्रेया बालपणापासून जोडली गेलेली आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.