खडकी भागातील वाहतूक कोंडी होईल दूर, नागरिक घेतील मोकळा श्वास!

35

प्रत्येकाला असे वाटत असते की, आपला प्रवास हा सुकर आणि सोपा व्हावा परंतु प्रवास करताना जर वाहतूक कोंडी म्हणजेच ट्राफिक झाली तर तासंतास आपल्याला ट्राफिक मध्ये अडकून राहावे लागते. पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना सतावत आहेत.

नागरिक या समस्येला वैतागले आहेत. खडकी येथे देखील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.भविष्यात खडकी येथे आता दोन भुयारी मार्ग रुंद करण्यात येणार आहेत, असे केल्याने खडकी भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

खडकी भागातील भुयारी मार्ग बरोबरच स्वतंत्र रस्त्याचे देखील रुंदीकरण महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे, त्यासाठी एकंदरीत खर्च पाच कोटी रुपये इतका येणार आहे.

खडकी भागातील भुयारी मार्ग रुंद करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त प्रशासक विक्रम कुमार आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी यांनी दिली. या सर्वांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीमध्ये रस्ता, भुयारी मार्ग रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या भागातील सर्व कामे महानगरपालिका स्वखर्चाने करणार आहे तसेच खडकी येथे सध्या मेट्रो चे काम देखील चालू आहेत. या मार्गा लगतच रेल्वे मार्ग आहे. रेल्वे मार्गातील भुयारी मार्गामुळे औंध, खडकी आणि येरवडा या भागातील वाहनचालकांना प्रवास करण्यासाठी सुकर होईल. भविष्यात हा मार्ग रुंद केल्यास वाहतूक कोंडी देखील कमी होईल, अशी आशा वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी खडकी पोलीस ठाणे ते खडकी सहाय्यक पोलीस कार्यालयाजवळचा मार्ग देखील रुंद करण्यात येणार आहे. या सर्व कामाला महानगरपालिका रेल्वे प्रशासनाला 25 कोटी रुपयांचा निधी देणार आहे.