Thane Shocker : मुरबाड येथे क्रूरतेचा कळस! माजी सभापतीने तलवारीने तरुणाचे दोन्ही हात कापले, गुन्हा दाखल

Thane Shocker : मुरबाड येथे क्रूरतेचा कळस! माजी सभापतीने तलवारीने तरुणाचे दोन्ही हात कापले, गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुरबाडमधून क्रूरतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जुन्या वैमनस्यातून माजी सभापतीने तलवारीने एका तरुणाचे दोन्ही हात कापले आहेत. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सुशील भोईर असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्याचे वय 27 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मुरबाडच्या देवपे गावचा रहिवासी आहे.

हेही वाचा : 3rd MJ Cup Invitational Hockey Tournament (Men and Women) 2023 : Krida Prabodhini log second win, qualify for last-8 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुशील रिक्षाने प्रवास करत असताना मुरबाड पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ हा आपल्या सहकाऱ्यांसह कारने तिथे आला. त्यांनी रिक्षासमोर कार उभी केली आणि सुशीलला जबरदस्तीने रिक्षातून बाहेर काढून जंगलात ओढले. येथे सुशीलला प्रथम बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर सर्वांनी सुशीलला पकडले व एका आरोपीने सुशीलचा एक हात कापला.

सुशील वेदनेने तळमळत राहिला, आरोपींकडे दयेची याचना करत राहिला, परंतु तेथे उपस्थित असलेल्या कोणालाही त्याची दया आली नाही. त्यानंतर त्यांनी त्याचा दुसरा हातही तलवारीने कापला आणि त्याला तसेच तिथे सोडून पळ काढला. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी जंगलात पोहोचून सुशीलला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात सुशीलची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी पीडित सुशील हा आरोपी श्रीकांत धुमाळ याच्याकडे काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळ याच्याशी झालेल्या काही वादातून भोईर याने नोकरी सोडली होती व हीच गोष्ट धुमाळला रुचली नव्हती. मुरबाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले की, त्यांनी मुख्य हल्लेखोर आणि अंकुशला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार आणि तलवारही जप्त केली आहे. धुमाळ अजूनही फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल. सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि शस्त्रांचा बेकायदेशीर वापर यासाठी आरोप ठेवण्यात आले आहेत.