लहानथोर रमले वैज्ञानिक जत्रेत!

274

विज्ञानशोधिकेतर्फे ‘सायन्स कार्निवल’मध्ये प्रयोग अन खेळणीही

पुणे : सायकलवर बसलेला मानवी सांगाडा… कुतूहल वाढविणाऱ्या सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल्स… वेगवेगळी इलेक्ट्राँनिक्स यंत्रे… मॅजिक रायटिंग पेन… अब्दुल कलाम, आईन्स्टाईन, सी. व्ही. रमण यांच्या प्रतिकृती… स्वतः करून पाहिलेले प्रयोग… गणितातील कोडी… जिओ-बॉलिवूड आणि त्यातील दृश्ये… आणि आणखी बरंच काही… अशा वैज्ञानिक जत्रेत लहानथोर सगळेच रमून गेले. त्यामुळे ‘विज्ञानासंगे खेळ रंगे’ असं वातावरण रविवारी पाहायला मिळालं.

निमित्त होते, भारतीय विद्याभवन संचालित मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राने आयोजिलेल्या ‘सायन्स कार्निवल’चे. विद्यार्थी-पालकांनी काही वेळ एकत्रित घालवावा, तसेच गंमतीजमतीतून विज्ञान शिकावे, हा यामागचा उद्देश होता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, अंतराळ विज्ञान यातील प्रयोग, उपग्रह यांच्या प्रतिकृती यात ठेवण्यात आल्या होत्या. काही प्रयोग ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही हे प्रयोग करून पाहीले. माहितीफलकांतून विज्ञान जाणून घेतले. गणितातील अनेक कोडी सोडवताना पालकही लहान मुलांप्रमाणे कुतूहलाने या गोष्टी करत होते.

विज्ञानशोधिकेतील तीनही मजल्यांवर विविध गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर प्रयोग, उपग्रहांच्या प्रतिकृती, दुसऱ्या मजल्यावर सिनेमात वापरलेली निसर्गस्थळे आणि त्यामागील वैज्ञानिक परिस्तिथी याविषयीची माहिती, पहिल्या मजल्यावर रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, तर तळमजल्यावर फन गेम्स आणि विज्ञान खेळणी होती. याशिवाय प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या प्रतिमा ठेवून त्यात आपला चेहरा पाहण्याची वेगळी गंमत विद्यार्थी पालकांनी अनुभवली. विज्ञानशोधिकेचे संचालक अनंत भिडे, उपसंचालक भारती बक्षी, संदीप नाटेकर आदींनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

‘सायन्स कार्निवल’बद्दल बोलताना आयोजिका आणि विज्ञानशोधिकेच्या उपसंचालक नेहा निरगुडकर म्हणाल्या, “हसतखेळत विज्ञान आत्मसात करण्यासाठी विज्ञानशोधिका नेहमीच आगळेवेगळे उपक्रम घेत असते. विद्यार्थी-पालकांनी एकत्रितपणे वैज्ञानिक गोष्टींचा आनंद घेत शिकावे, यासाठी कार्निवल घेण्यात आले. अनेक गोष्टींबद्दलचे कुतूहल या कार्निव्हलमुळे उलगडले आहे. विज्ञानशोधिकेत कोणीही येऊन सहज विज्ञान शिकु शकते.”