खळबळजनक : घरगुती वादातून आपल्या पतीवर धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे हा प्रकार घडला आहे.
खुनाच्या घटनेनंतर संशयित पत्नी पसार झाली आहे. तर एकाच दिवसात मिरज तालुक्यामध्ये सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली या ठिकाणी पारधी वस्तीवरील कुटुंबातल्या पती-पत्नीमध्ये घरगुती वादातून भांडण झाले. वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने थेट पतीचा खून केल्याची घटना घडली. सुभेदार आनंदराव काळे (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर चांदणी काळे असे पत्नीचे नाव आहे.
हेही वाचा :वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलला बोलावणे पडले महागात, कासारवाडीतील बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल
दुपारच्या सुमारास जेवण बनवताना दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. यातून सुभेदार काळे पत्नी चांदणी हिच्या अंगावर धावून गेला. यावेळी पत्नीने धारदार शस्त्राने पती सुभेदार काळे याच्या अंगावर आणि छातीवर वार केले. यामध्ये पती सुभेदार काळे याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पारधी वस्तीवर एकच खळबळ उडाली. दरम्यान मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर या घटनेनंतर पत्नी चांदणी काळे ही पसार झाली आहे.
दरम्यान, सकाळच्या सुमारास मिरज तालुक्यातल्या बेडग येथे एका मुलाने बापाला ट्रॅक्टर खाली चिरडून ठार केल्याची घटना घडली होती.
त्या घटनेचा तपास सुरू असतानाच दुपारच्या सुमारास एरंडोली गावात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. एकाच दिवसात मिरज तालुक्यात सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने सांगली जिल्हा हादरून गेला आहे.