पगार फक्त 30 हजार रुपये महिना असणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची तक्रार मध्यप्रदेशातील भोपाळ येथील लोकायुक्त कार्यालयाला मिळाली. ही तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत अधिकाऱ्याच्या घरासह अनेक ठिकाणी छापे टाकले गेले. या छापेमारीनंतर यंत्रणांच्या हाती जे लागलं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. मालमत्तेची यादी पाहून तुम्हाला देखील हे कमवलं तरी कसं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार, हेमा मीना हाऊसिंग कॉर्पोरेशनचे प्रभारी सहायक अभियंता आहेत. हेमा या कंत्राटी कर्मचारी आहेत. गुरुवारी, 11 मे रोजी पहाटे लोकायुक्तांच्या पथकाने भोपाळ, रायसेन आणि विदिशा येथील त्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आणि अवघ्या काही तासांतच इंजिनीअर हेमा मीना यांची सुमारे सात कोटींची मालमत्ता सापडली.
लोकायुक्त टीमचे नेतृत्व करणारे डीएसपी संजय शुक्ला यांनी माहिती दिली की, हेमा मीना हाऊसिंग कॉर्पोरेशन भोपाळमध्ये प्रभारी सहायक अभियंता (कंत्राटी) म्हणून काम करतात. 2020 मध्ये हेमा यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार आली होती. याप्रकरणी तपास सुरू करून गुन्हा दाखल करण्यात आला.