अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर; प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी यांचे प्रतिपादन

30
पुणे : “भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेला सक्षम बनविण्याचे व त्यात पारदर्शीपणा आणण्याचे दायित्व सनदी लेखापाल यांच्यावर आहे. त्यामुळे सनदी लेखापाल म्हणून काम करताना सखोल ज्ञान आणि समर्पण भावनेने काम करावे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे आयोजित दीक्षांत सोहळ्यात डॉ. उमराणी बोलत होते. खराडी येथील मेफील्ड इस्टेटमध्ये झालेल्या सोहळ्यात आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, उपाध्यक्ष सीए रणजित कुमार अग्रवाल यांच्या ऑनलाईन उपस्थित जवळपास ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
हा दीक्षांत समारंभ पुण्यासह दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, जयपूर, इंदोर, गाजियाबाद, अहमदाबाद, लुधियाना, हैद्राबाद आदी ठिकाणी पार पडला. या प्रसंगी सीए प्रमोद शिंगटे, दीक्षांत समारंभाचे समन्वयक आणि केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, विभागीय समितीचेसदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, खजिनदार ऋषीकेश बडवे आदी उपस्थित होते.
डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, “सनदी लेखापाल (सीए) यासारख्या अवघड परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि त्याना पाठींबा देणाऱ्या त्यांच्या पालकांचे कौतुक आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून, त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात योगदान द्यायचे आहे. मानवी विकास निर्देशांक उंचवण्यासाठी आपण करावे. शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी सनदी लेखापालांनी प्राधान्य द्यावे.”
जागतिक तापमानवाढीसह इतर अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. त्याचा फटका शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे भवतालच्या बदलांबद्दल सतर्क राहून, त्याला अनुषंगिक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. उमराणी यांनी नमूद केले.
सीए प्रमोद शिंगटे म्हणाले, “आर्थिक क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. ऑडिटसह अन्य गोष्टींसाठी बँका सनदी लेखापालांवर अवलंबून असतात. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण योगदान देण्याची संधी आहे. लोकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आपण करायला हवे.”
सीए चंद्रशेखर चितळे यांनी ‘आयसीएआय’कडून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांविषयी सांगितले. तसेच सनदी लेखापालांना शपथ दिली. सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीए समीर लड्डा आणि सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.