हडपसर : ‘‘पुणे शहरासह राज्यातील सर्वच शहरे अनियंत्रितपणे वाढत आहेत. त्यांच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष नाही. सध्या शहरे खड्ड्यांनी त्रासलेली आहेत. त्याविरोधात आमची राज्यभर आंदोलने सुरू आहेत. सरकारला त्याची काळजी नाही.
मतदार वाढवा आणि मतदान पदरात पाडून घ्या, बाकी गेलं तेल लावत, अशी त्यांची मानसिकता आहे,’’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
मनसेच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष इंद्रायणी नाव्हले यांच्या काळेबोराटेनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मनसेचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर, साईनाथ बाबर, किशोर शिंदे, अजय नाव्हले, इंद्रायणी नाव्हले आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘ज्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून देता, तेच या खड्ड्यांचे प्रश्न उभे करून पुन्हा नव्याने मतदान मागतात.
लोक आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करत परत त्यांनाच निवडून देतात. हे खड्डे पहिल्यांदाच पडलेले नाहीत, गेल्या अनेक वर्षांपासून ते पडतच असून, लोक त्यातूनच प्रवास करीत असतात, त्याचे मला आश्चर्य वाटते. मतपेटीतून तुमचा राग व्यक्त होत नाही, तोपर्यंत हे खड्डे बुजणारच नाहीत.
मनसेने आजपर्यंत अनेक विषयांवर आंदोलने केली, पण पदरी काय पडले? तरीही पुण्यासह मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक या महामार्गांवर आमची आंदोलन सुरू आहेत. ते पाहून तरी सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा आहे.’’ लोकसंख्येनुसार किती रुग्णालये असावीत, किती घरे असावीत, याचे नियोजन असते. मुंबईतील ब्रिटिश काळातील नियोजन चांगले होते. असल्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत. लोक जन्म झालाय म्हणून जगताहेत, अशी निराशाजनक प्रतिक्रिया या वेळी ठाकरे यांनी दिली.
प्रत्येकवेळी तोडफोड नको
आंदोलनात कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या तोडफोडीवर ठाकरे म्हणाले, ‘‘आंदोलनात प्रत्येकवेळी तोडफोड करण्याची गरज नाही. लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्यासाठी आंदोलन करीत आहोत, त्यांनाच त्रास होऊ नये, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी.’’