Pune Traffic Update : शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांना पहिल्यांदा टोइंगसह ७८५ रुपये, मोटारचालकांना एक हजार ७१ रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तर दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास अनुक्रमे एक हजार ७८५ रुपये आणि दोन हजार ७१ रुपये दंड भरावा लागणार आहे. यामुळे नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
वाहनचालकांकडून दंडाची रक्कम आकारताना वाहनचालक आणि पोलिस यांच्यात अनेकदा वाद होतात. या पार्श्वभूमीवर मोटार व्हेइकल ॲक्टनुसार शहर वाहतूक शाखेने दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी केले आहे.
वाहतूक पोलिस अंमलदार दंडाची रक्कम रोख स्वरुपात घेत नाहीत. दंडाची रक्कम भरण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय इ-चलन मशिनवर उपलब्ध नाही. त्यामुळे यूपीआय पेमेंट स्वीकारता येत नाही. केवळ डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच दंडाची रक्कम घेतली जाते.
नो पार्किंगमधून वाहन उचलल्यानंतर दंडाची रक्कम भरताना संबंधित वाहनावर पूर्वीच्या दंडाची रक्कम प्रलंबित असल्यास कमीत कमी एक दंड भरावा लागेल. त्यामुळे कमीत कमी दोन चलनाची रक्कम भरल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नाही.
वाहतूक पोलिस या मशिनमध्ये बदल करू शकत नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेने जारी केलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.