Pune Prahar : महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन 5.0; जयंत पाटलांनी दिले संकेत

637

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता सुरु आहे. तीन दिवसांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार आहे. मात्र अद्याप मुंबई पुणे या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा काही केल्या कमी होत नाही आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र परिस्थिती बघता सरकार लॉकडाऊन 5.0 जाहीर करणार का यावर प्रश्नचिन्ह असताना कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील लॉकडाऊन 5.0 चे संकेत दिलेत. तसंच राज्यात कशापद्धतीनं लॉकडाऊन असेल याबाबतची कल्पना दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी लॉकडाऊनबाबत संकेत दिलेत. 

काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करणार 

राज्यातली कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिल्यास काही भागात तुरळक कोविड-19 चे रुग्ण आहेत. त्यामुळे 31 मे रोजीनंतर त्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी काय करता येईल यावर प्रामुख्यानं लक्ष देत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्या ठिकाणी कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आहेत. त्या भागात पुन्हा आर्थिक व्यवहार सुरु करण्यासाठी तसंच जनतेच्या संसाराचा गाडा पुन्हा कसा चालू होईल, यावर विचार योजना आखत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई पुणे शहरात लॉकडाऊन 5.0 असण्याची शक्यता 

राज्यातील परिस्थिती पाहिल्यास काही शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे त्या शहरापुरता लॉकडाऊनचा नियम आज जसा आहे तसाच किंवा थोडासा वेगळ्या पद्धतीनं करावा लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या रुग्णांचा आकडा पाहिल्यावर मुंबई पुणे या शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी सांगितल्यानुसार 31 मे रोजीनंतर मुंबई पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन कायम असण्याची दाट शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या निर्णयावर अवलंबून 

पुढे जयंत पाटील यांनी हे देखील स्पष्ट केलं की, जर पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढवला तर आम्हाला त्यांच्या गाईडलाईन फॉलो कराव्या लागतील, त्यामुळे हे तेव्हाच शक्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 मे रोजीनंतर लॉकडाऊन वाढवण्याचं ठरवलं तर त्याबाबतीत आम्हाला केंद्र सरकारकडून गाईडलाईन येतील  त्यानुसार त्याचा अभ्यास करुन राज्यात लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल.