Pune Prahar : कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा, शिवसेनेची मागणी

139

मुंबई : कोरोना संकटामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का बसला आहे. आर्थिक चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करण्यात येत आहेत. मात्र, देशातील मंदिरं अद्यापही बंदच आहेत. मंदिरं खुली करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंदिरं खुली करण्याचं आवाहन केलं आहे.

देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालविण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल आणि त्यात काय चुकले? आम्ही स्वत मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

मंदिराचेही एक अर्थकारण असतेच आणि त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत आणि मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, माय लॉर्ड चूकभूल द्यावी घ्यावी, असं आवाहन अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

एकीकडे राज्यामध्ये आर्थिक व्यवहाराचा समावेश असलेल्या प्रत्येक गोष्टीस परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच पैशांचा संबंध असेल तर धोका पत्करण्याची राज्याची तयारी आहे. मात्र मंदिरं, मशिदी उघडण्याचा धार्मिक प्रश्न येतो तेव्हा मात्र नेमकी ‘कोरोना’ची आठवण येते. हे अथिशय विचित्र आहे, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

कोरोना आहेच आणि आणखी काही काळ राहील. तरीही महाराष्ट्रात हळूहळू बऱ्याच क्षेत्रांची उघडझाप सुरुच आङे. यात न्यायालय म्हणतेय त्याप्रमाणे फक्त आर्थिक व्यवहारांचा प्रश्न उद्भवतोय असे नाही. दशाची आर्थिक घडी साफ विस्कटलेली आहे. त्यामुळे राज्या चालवण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल व त्यात काय चुकले?, असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आला आहे.