LONIKALBHOR : बिनविरोध निवडीच्या बैठकीत कोर कमिटीच्या नावावरून प्रचंड गोंधळ

LONIKALBHOR : लोणी काळभोर : पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीसाठी गुलमोहर लॉन्स येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजोन केले होते .या मध्ये बैठकीच्या शेवटी कोअर कमिटीची नावे यशवंत कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ नेते के .डी कांचन यांनी घोषित करताच या नावावरून प्रचंड गोंधळ झाला . त्यावरून अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून केली असून कोर कमिटीची नावावरून वाद झाला तर बिनविरोध निवडणूक कशी होईल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे . या बैठकीत हवेली तालुक्यातील अनेक माजी संचालकांसह सभासद वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता . यावेळी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

उमेदवारी अर्ज भरलेल्यांना तसेच सभासदांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी बिनविरोध वर चर्चा झाली. चार वाजता सुरू झालेली बैठक नऊ वाजता संपली यामध्ये काहींचा बिनविरोधचा सुरू होता तर काहींचा निवडणुकीचा सुरू होता तर काहींनी नव्या जुन्यांचा मेळ घालून कारखाना बिनविरोध करण्यात यावा अशी आपली भूमिका मांडली. त्यामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी सांगितले की ज्यांनी कारखाना बंद पाडला त्यांच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. एकीकडे गटातटाचे राजकारण बाजूला ठेवा असे सांगायचे आणि दुसरीकडे गटातलाच माणूस घेऊन परस्पर बैठका घ्यायच्या. असे जर कोणी वागत असेल आणि आम्हाला तुच्छ वागणूक दिली गेली तर निवडणूक लढणार आहे.

लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी सांगितले की मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे .पण माघारी अर्ज कोणाकडे द्यायचा ज्यांनी कारखाना बंद पडला त्यांच्याकडे द्यायचा .असा प्रश्न उपस्थित केला . या निवडणुकीत ज्यांनी कारखाना बंद पाडला त्यांचे सगेसोयरे न घेता इतर उमेदवारांना संधी द्यावी.

यावेळी चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले की कारखाना कशा प्रकारे चालू करणार ते ज्येष्ठांनी सांगावे जमीन न विकता कारखाना चालू करावा .युवा वर्ग कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत .कारखाना चालू करण्यासाठी सर्व ज्येष्ठांनी सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले .पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी सांगितले की निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय गावातील गटातटाचे राजकारण सोडून सर्वांनी एकत्र येऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या गावातील गट तट मत भेद विसरून निवडणूक बिनविरोध करावी निवडणूक बिनविरोध झाली नाहीतर मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा असून ज्यांनी कारखान्याचे नुकसान केले व शेतकरी देशोधडेला लावला त्यांना जागा दाखवून देण्याचे काम शेतकरी करणार आहे.

यावेळी मनीभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष व कारखान्याचे माजी संचालक रामदास चौधरी यांनी सांगितले की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे व ज्येष्ठ नेत्यांनी थांबले पाहिजे .तर पेठगावचे सोमनाथ चौधरी यांनी सांगितले की ज्येष्ठांना बरोबर घेऊन तरुणांच्या हातात कारखान्याची सत्ता देऊन ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे प्रत्येक क्षेत्रात तरुण वर्ग नाव कमवत असून कारखान्यात पण तरुण वर्गाला संधी दिली पाहिजे. यावेळी विकास लवांडे यांनी सांगितले की पक्षीय राजकारण आणू नये बिनविरोध करण्यासाठी सर्वांची मदत घेतली पाहिजे राज्य सरकारची पावलोपावली मदत लागणार असून लोणी काळभोर ,उरुळी कांचन आणि थेऊर या गावातील नेत्यांनी गावकी ,भावकीचे राजकारण सोडून एकत्र येणे गरजेचे आहे.

विशाल हरपळे यांनी सांगितले की प्रथमत: ही सर्व ज्येष्ठ मंडळी एक आहे का याचे उत्तर द्यावे तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. ज्येष्ठांनी आधी एकमेकांविरुद्ध पॅनलन टाकता एकत्र यावे. उरुळी कांचनचे माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी सांगितले की एवढे फॉर्म का आले याचे आत्मचिंतन करण्याची गरज असून जुन्या संचालकांवर राग असल्यामुळे एवढे फॉर्म आले आहेत. नात्यागोत्यांचा बाजार मांडण्यापेक्षा व गटातटाचे राजकारण करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करणे गरजेचे आहे .

बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे त्यांनी सांगितले की सगळ्यांचा सूर हा बिनविरोध निवडणूक व्हावी असा असून प्रत्येक गटात बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. अनेकांनी तर जे माजी संचालक झालेले आहेत त्यांच्या घरातील किंवा त्यांच्या नात्यागोत्यातील कोणालाही संधी देऊ नये असे विचार व्यक्त केले.शेवटी सहाही गटातील चर्चा संपल्यानंतर जेष्ठ मंडळींनी एक कोर कमिटी करण्याचा निर्णय घेतला या कोअर कमिटीची नावे जाहीर करत असताना प्रचंड गोंधळ झाला.

या गोंधळामुळे ज्येष्ठांना कोर कमिटीची नावे बदलण्यास सभासदांनी भाग पाडले. प्रत्येक गावातील गटांनी आपापसात बसून दोन नाव द्यावीत अशा सूचना केल्या यावेळी अनेक माजी संचालकांनी आम्ही निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. तर काहींनी जेष्ठ आणि तरुणांना एकत्रित करून पॅनल तयार करावे अशी मागणी केली एकंदरीतच बिनविरोधचा सूर निघाला खरा परंतु शेवटी कोर कमिटीवरुन जो अभुतपुर्व गोंधळ झाला त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार का याचीच सभासदांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. हवेली मध्ये अनेक दिग्गज नेते ज्या त्या राजकीय पक्षाशी आपले संधान बांधून आहेत . यशवंत सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रात एक नंबरला असणारा साखर कारखाना होता .आणि तेरा वर्षांपूर्वी बंद पडला .त्यानंतर या कारखान्यासाठी कोणीही शासनाकडून मदत उपलब्ध करून घेऊ शकले नाहीत खरंतर याचीच खंत सभासदांना वाटत आहे. इतर साखर कारखान्यांना शासनाची भरघोस अशी मदत आहे.

परंतु यशवंतला शासनाने कुठल्याही प्रकारची मदत हवेलीतील नेत्यांमार्फत केली नाही. याचा रोष सभासदांच्या मनात आहे. त्यामुळे वरिष्ठांवर हवेलीत स्वतःला दिग्गज म्हणवणारे नेते मात्र यशवंत चालू करण्यासाठी शासकीय पॅकेज आणण्यात अपयशी ठरले. याबाबत हवेलीचे ज्येष्ठ नेते कारखान्याचे माजी संचालक प्रताप गायकवाड यांनी तीव्र शब्दात आपला रोष व्यक्त केला . ते म्हणाले की इथे बसलेल्यांमध्ये मनात एक ,ओठावर एक आणि पोटात एक अशी अवस्था आहे . यावेळी कारखाना निवडणूकीसाठी मदत करणारे कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांचे अनेकांनी आभार मानले . कारखान्याचे माजी संचालक राजू पाटील घुले यांनी आकडेवारीनुसार कारखान्याची पुढील दिशा कशी असेल हे सांगून कारखाना बिनविरोध करण्यासाठी आपल्याला कसा प्रयत्न करावा लागेल व कारखाना काटकसरीने कसा चालवावा लागेल पॅकेज कसे मिळवावे लागेल याचे मार्गदर्शन आकडेवारी सहित केले.

माजी खासदार अण्णासाहेब मगर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली या कारखान्याच्या जीवावर अनेक दिग्गजांनी आपली राजकारणाची पोळी भाजली परंतु गेल्या १३ वर्षापुर्वी कारखाना बंद झाल्यापासून कारखान्याकडे बघायला या मंडळीला वेळ नव्हता तसेच अण्णा साहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासही ही मंडळी कधी कारखाना कार्यस्थळावर आली नाही .त्याचा रोष सभासदांच्या मनात असून कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर ही मंडळी मात्र एकत्रित आली असुन शेतकऱ्यांमध्ये कारखान्याची चिमणी पेटणार का ? का पुन्हा मागचे दिवस येणार याबाबत जोरदार चर्चा सुरू असून सभासद मात्र जी मंडळी कारखान्याच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणार अशा मंडळींच्या पाठीमागे शेतकरी ठाम उभे असुन मांजरी बाजारात ज्यांनी शेतकरी विरोधी खोतीदार व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला आहे . त्यांना शेतकरी जागा दाखणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.