नुसत्या मशाली घेऊन गाड्यांचे आवाज करीत रस्त्याने हिंडणे म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती किंवा राज्याभिषेक साजरे करणे नव्हे तर त्यांचे विचार प्रत्यक्षात अंगिकारले पाहिजेत असे मत सामाजिक कार्यकर्ते संदिप गुळूंजकर यांनी व्यक्त केले.
अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात भेकराईनगर येथील तुकाई टेकडीवरील भेकराईनगर योग सामाजिक संस्थेच्या जागेवर ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात जागोजागी लावलेले भगवे झेंडे, सर्व योग साधकांनी त्यासाठी घेतलेली अपार मेहनत, केलेली साफसफाई,स्पीकर वरून दूर अंतरापर्यंत ऐकू जाईल अशी महाराजांची गाणी आणि अंगावर शहारे उभे करणारे पोवाडे सर्व दूर ऐकू जात होते.
सुरवातीला कुमारी स्वरा काळाणे या लहान मुलीच्या झंझावाती भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिच्या ह्या भाषणाचे उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.
तुकाई टेकडीवरील या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तरूण नेते अजिंक्य ढमाळ , सातववाडी येथील योगा क्लासचे योगशिक्षक भामे सर , जाभंले सर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात शिवराज्याभिषेक आणि शिवाजी महाराज आपल्या आचरणातून जगाला दाखवून देणारा व्हिएतनाम हा एक छोटासा देश असल्याचे सांगून अमेरिके सारखा बलाढ्य देश त्याला हरवू शकत नाही असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनसेवा बॅंकेचे मॅनेजर सूरज घाडगे यांनी दीपप्रज्वलन करून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर केलेल्या भाषणात शिवराज्याभिषेक विषयावर आपल्या ओघवत्या भाषेत शिवराज्याभिषेक सोहळा साक्षात डोळ्यासमोर उभा केला.
संजय ढोक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. तर मांढरे सरांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भेकराई नगर मधील महिला, पुरुष आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.