LONIKALBHOR | कोरेगावमुळ येथे लाखो रुपयांची माती व मुरूम चोरीला; महसुल कार्यालयाचे दुर्लक्ष

97

लोणी काळभोर : कोरेगावमुळ येथील जलजीवन मिशन अंतर्गत गावात होणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामातील काढलेली माती व मुरूम चोरीला गेला असून याबाबत महसूल कार्यालयाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत माहिती अशी की कोरेगाव मूळ केंद्र सरकारच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत काम चालू असून खोदकाम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

या खोदकामांतर्गत सुमारे १८००ब्रास माती व १२० ब्रास मुरूम चोरीला गेला असून शासकीय दरबारात याची दखल घेतली जात नसुन उलट मुरूम व माती चोरणाऱ्याला पाठीशी घालत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावात ठिकठिकाणी मुरमाचे व मातीचे ढीग दिसत असून ही माती आली कुठून असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहे .ही पोयठा माती असून अत्यंत उपयुक्त आहे.

नर्सरी , शेती व वीट भट्टी साठी याचा उपयोग केला जात आहे .लाखो रुपयांची माती व मुरूम चोरीला गेल्यामुळे पूर्व हवेलीत खळबळ उडाली आहे.याबाबत उरुळी कांचन येथील मंडळाधिकारी यांच्याकडे दोन दिवसापासून संपर्क करण्यास आला असता त्यांनी फोन उचलला नाही.

लवकरात लवकर मुरुम व माती चोरणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत काही सदस्यांच्या नातेसंबंधातील मंडळींनी या माती व मुरुमावर डल्ला मारल्याची चर्चा नागरिकांच्यात चालू आहे.