पुण्याचा विकास : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडचा सर्वंकष प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे.
एकूण 128 कि.मी लांबीच्या 65 मीटर रुंदीच्या या रस्त्यावर छोटे आणि मोठे मिळून एकूण पंधरा उड्डाणपूल, दोन रेल्वे मार्गांवरील उड्डाणपूल, पाच बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
“पीएमआरडीए’ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडून सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या रिंगरोड सुधारित खर्चासही राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार सुमारे 14 हजार 200कोटी रुपयांच्या मान्यता मिळाली आहे.
एकूण 128 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड असला, तरी त्यापैकी 88 किलोमीटर रिंगरोडचे काम पीएमआरडीए, 40 किलोमीटर काम “एमएसआरडीसी’ आणि 5.70 किलोमीटर लांबीच्या रिंगरोड पालिकेच्या हद्दीतून जात असल्यामुळे ते काम पुणे मनपा करणार आहे.
रिंगरोडच्या “डीपीआर’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे या दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
रिंगरोडच्या सुधारित खर्चास नुकतीच मान्यता देखील मिळाली आहे, अशी माहिती “पीएमआरडीए’चे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.