भारतीय जनता पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला असून शहराचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रा. निंबर्गी हे काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाचा आज रविवारी (ता. २१ मे) सकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात निर्धार महामेळावा आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे नेते उद्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्या महामेळाव्यात भाजपचे प्रा. निंबर्गी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशोक निंबर्गी हे गेल्या ३३ वर्षांपासून सोलापूर भाजपमध्ये सक्रिय आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले निंबर्गी हे गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यांचे राजीनाम्याचे पत्र काँग्रेस पक्षाच्या महामेळाव्या पूर्वसंध्येला व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रा. निंबर्गी म्हणाले की, गटबाजीमुळे पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांची एक फळी पक्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होवू लागली. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्याचा वेळोवेळी प्रयत्न करूनही नेतृत्वाने याची दखल घेतली नाही.
भविष्यात ती घेणार नाहीत, याची खात्री पटल्याने मी अत्यंत जड अंतःकरणाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक वर्षांचा ऋणानुबंध तोडण्याचं दुःख काय असतं, हे मी आज अनुभवतो आहे, परंतु वातावरणच असं तयार केल जातं की तुम्ही स्वतःहून बाहेर पडावं. असो. नाईलाज आहे, माझी घुसमट खूपच वाढल्याने मी हा निर्णय घेतोय. ही परिस्थिती अशीच राहीली तर भविष्यात अनेक कार्यकर्ते असाच निर्णय घेतील. याचे प्रत्यंतर सर्वांना लवकरच येईल, असा इशाराही निंबर्गी यांनी पत्रातून पक्षाला दिला आहे.