Big News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले; हे आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

618

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द प्रचंड वादळी ठरली.

महाविकास आघाडीचं सरकार असताना कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या वादग्रस्त पत्राचीही मोठी चर्चा झाली होती. तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांवरून कोश्यारी यांचे महाविकास आघाडीसोबत प्रचंड मतभेद झाल्याचं समोर आलं होतं.

सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यातून कोश्यारी यांनी वाद ओढावून घेतला होता. या सगळ्या घडामोडींमुळे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लावत असल्याचा आरोप होत होता. परिणामी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपचीही राजकीय कोंडी झाली होती.

त्यामुळे कोश्यारी यांची गच्छंती अटळ मानली जात होती. आता त्यांच्या जागी राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रमेश बैस यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेत राज्याच्या राजकीय गाडा सुरळीत ठेवण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे.