BIG NEWS : पुण्यासह राज्यभरात वाढल्या अशा घटना; मोबाइलवर…

202
hony trap

पुणे : शहरात सायबर गुन्ह्यांचा विळखा घट्ट होताना ‘लोन अॅप’द्वारे फसवणूक आणि बदनामीचे प्रकार २०२१च्या तुलनेत चौपटीने वाढले आहेत. सायबर पोलिसांकडे २०२२ या वर्षांत १९ हजार ३८७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

यातील सर्वाधिक तीन हजार ४७१ गुन्हे ‘लोन अॅप’ संदर्भातील आहेत. त्या आधीच्या वर्षी (२०२१) हेच गुन्हे एक हजारपेक्षा कमी होते.

ऑनलाइन पद्धतीने जामिनाविना सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने ‘लोन ॲप’चा वापर वाढला आहे. या माध्यमातून किरकोळ रक्कम तत्काळ मिळते. या प्रक्रियेत मोबाइलमधील खासगी माहितीचा वापर करण्याची अनुमती कंपनीला द्यावी लागते. कर्जाचे हप्ते भरले नाहीत किंवा अनेकदा कर्ज फिटल्यानंतरही कंपनीकडून सतत संदेश पाठवण्य़ात येतात.

मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या इतर क्रमांकावर संबंधित व्यक्तीची माहिती पाठवली जाते.

संपर्क यादीतील लोकांना संदेश पाठवून कर्जाची रक्कम भरायला सांगा, असे बजावले जाते. मोबाइलमधील खासगी माहितीचा वापर करण्याची परवानगी दिल्याने छायाचित्रांचा वापर करून बदनामी करण्याचेही प्रकार घडले आहेत. बदनामीच्या भीतीने अनेक तक्रारी पुढे येत नसल्याने सायबर पोलिसांचे काम वाढले आहे.

लोन ॲप’वरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केला; तसेच चोरलेले दागिने विकून कर्ज फेडले. दुसऱ्या घटनेत ‘लोन अॅप’द्वारे घेतलेल्या कर्जानंतर बदनामीच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली. या दोन भयंकर घटना मागील वर्षी घडल्यानंतर ‘लोन अॅप’चा विद्रूप चेहरा समोर आला. ‘लोन अॅप’च्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन सायबर पोलिसांनी राज्यातील; तसेच राज्याबाहेरील काही कॉल सेंटर उद्ध्वस्त केली. हे गुन्हे प्रामुख्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड अशा राज्यांतून घडवले जातात. या राज्यांमध्ये सायबर पोलिस पथकांची कमतरता असल्याने या टोळ्या देशभरात धुमाकूळ घालत आहेत.

‘लोनअॅप’द्वारे फसवणूक आणि बदनामीचे प्रकार वाढल्याने; तसेच ‘लोनअॅप’मुळे आत्महत्या आणि खुनासारखे गंभीर घडत असल्याने ‘लोन अॅप’वर बंदी घालण्याचा प्रस्ताव सायबर पोलिसांच्या वतीने तयार करण्यात आला आहे. ‘प्ले स्टोअर’वरील ‘लोन अॅप’बाबत तक्रार आल्यानंतर गुगल कंपनीला माहिती कळवून ही ॲप काढून टाकण्यात येणार आहेत.

आर्थिक अडचणीवेळी ‘लोन अॅप’चा वापर टाळणे आवश्यक आहे. अशा अॅपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे.

– मीनल पाटील, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

‘थोड्या पैशांसाठी दलदलीत अडकलो’

पैशांच्या गरजेपोटी विजयने (बदलेले नाव) लोन अॅपद्वारे पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात साडेतीन हजार रुपये मिळाले. ‘सहा दिवसांच्या मुदतीच्या आधीच पैसे परत करण्यासाठी तगादा सुरू झाला. पाच हजार रुपये वेळेत जमा केले. त्यानंतरही फोनमधील संपर्क क्रमांकांच्या व्हॉट्सअॅपवर छायाचित्र आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला. कर्ज फेडल्याने आपोआप नवीन कर्ज मंजूर झाले. ही रक्कम सुमारे पाच लाखांपर्यंत वाढत गेली. महिनाभर सतत धमक्या आणि बदनामी असा मानसिक त्रास सुरू होता. थोड्या पैशांसाठी मी दलदलीत अडकलो होतो,’ असा अनुभव विजयने सांगितला.