महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत शिरूर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके व शिवसेना माजी जिल्हा प्रमुख संजय सातव यांच्यासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठे शक्तीप्रदर्शन करत शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुकीत काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिरूर येथे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शनात महिला, तरुण, पुरुष , वृद्ध असे अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
तसेच यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो शरद पवार जिंदाबाद, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
यावेळी बोलताना अँड . अशोक पवार म्हणाले की, शिरूर हवेली मतदार संघातून शिरूर हवेलीच्या मतदारांच्या व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी भेटली असून शिरूर तालुक्यासह हवेली तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय आम्ही कायम ठेवत आहे. समोरील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही, कारण त्यांच्याकडे उमेदवार नसून ते आता एक आयात उमेदवार घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. समोरचा उमेदवार कोणी असो, मी केलेली विकास कामे सर्वसामान्य मतदार शेतकरी, कामगार महिलावर्ग यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. असे पवार यांनी सांगितले.